दौंड मधील अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू, वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची दलित संघटनांची मागणी

अख्तर काझी

दौंड : दौंड- पाटस रोडवर दि.3 ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातामध्ये येथील स्वप्निल शिंदे यांचा मृत्यू झालेला आहे, परंतु अद्याप पोलिसांनी संबंधित वाहन चालकाला अटक केलेली नाही, त्या निषेधार्थ येथील दलित संघटनेने पोलीस स्टेशन समोर आंदोलन सुरू केले आहे.

मयत स्वप्निल अशोक शिंदे (रा. भीम नगर, दौंड) आपल्या भावाबरोबर दुचाकी वरून दौंड -पाटस रोडने घरी येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो ने दुचाकीस जबर धडक दिली त्यामध्ये स्वप्निल शिंदे यांचा मृत्यू झाला, या टेम्पो वरील वाहन चालकाने अमली पदार्थाचे सेवन केलेले होते त्यामुळेच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्याने स्वप्निल च्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झालेला आहे , त्यामुळे या वाहन चालका विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा व टेम्पो मालकालाही या प्रकरणामध्ये सह आरोपी करून त्यांना अटक करावी अशी मागणी आरपीआय चे पदाधिकारी भारत सरोदे, पी. आर .पी. चे अमोल सोनवणे तसेच वंचित बहुजन आघाडीचे अश्विन वाघमारे यांनी केली आहे.

मागणी मान्य न झाल्यास दलित संघटनांकडून तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. दौंड पोलीस प्रशासनाने अपघातास कारणीभूत असणाऱ्या वाहन चालकाला व टेम्पो मालकाला सहकार्य न करता मयत स्वप्निल शिंदे यांच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षाही दलित संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दलित संघटनांचे पदाधिकारी रतन जाधव, प्रशांत मोरे, राजू भालसेन, दीपक सोनवणे, राजेंद्र सोनवणे, शंकरराव जगताप, आशिष शिंदे ,निलेश मजगर, मयूर कांबळे तसेच महिलावर्ग उपस्थित होते.

दलित संघटनांनी पत्रकारांना दिलेल्या पत्रामध्ये असे नमूद केले आहे की, सदरच्या अपघातानंतर वाहन चालक फरार झालेला आहे, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. असे असताना दौंड पोलीस स्टेशनच्या ताब्यात असलेल्या अपघातामधील टेम्पोतील माल पोलीस प्रशासनाची कोणतीच परवानगी नसताना टेम्पो मालकाने दुसऱ्या टेम्पोतून चोरून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

त्यामुळे संबंधित वाहन चालकाला अटक करावी ,वाहन मालकालाही सह आरोपी करावे तसेच पोलीस प्रशासनाची परवानगी नसताना टेम्पोतून माल नेला जात असल्या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दलित संघटनांच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांनाही देण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.