स्वयंघोषित ‘मीडिया’ पुन्हा तोंडावर आपटले, ‘त्या’ निवडणुका होणार ‘ही’ बातमीच ‘खोटी’

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही स्वयंघोषित मीडियाने आणि त्याचे अनुकरण करून काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही हे आता सिद्ध झाले आहे.

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ह्या बातम्या नेमक्या कोणत्या अधिकृत शासकीय यंत्रणा किंवा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आणि कोणत्या सूत्रांच्या सुपीक डोक्यातून निघाल्या हा शोध पत्रकारितेचा विषय बनला आहे.

मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.