अख्तर काझी
दौंड : दौंड (बोरावके नगर) येथील युवा व्यावसायिक अमोल सुभाष साळुंखे (वय 33,रा. बोरावके नगर दौंड) यांची अज्ञात इसमाने डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून खून केला असल्याचे घटना उघडकीस आली. बोरावके नगर येथील सेवा रस्त्याने लिंगाळी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर खुनाची घटना घडली. अमोल यांच्या पत्नी तेजस्वी साळुंखे यांनी दौंड पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रात्रीतच तपासाचे सूत्र वेगाने हलवीत मयत अमोल याचा व्यावसायिक भागीदार महेश गणेश काळे (वय 33,रा. बोरावकेनगर, गोपाळवाडी, दौंड. मूळ रा.अजनुज,श्रीगोंदा) याला अटक केली आहे. पुणे जिल्हा ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांच्या पथकाने कामगिरी बजाविली.
सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, मयत अमोल हे रात्री 10.30 वाजेपर्यंत घरी परतले नाहीत म्हणून पत्नी तेजश्री व मामा त्यांचा शोध घेत असता लिंगाळी हद्दीतच ते आपल्या कारमध्ये जखमी अवस्थेत सापडले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उपचारा आधीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. मयत अमोल व आरोपी महेश काळे दोन व्यवसायात (स्लाइडिंग विंडो काम, कलर विक्री) भागीदार होते. मागील दोन वर्षात त्यांनी या व्यवसायातून 30 ते 40 लाख रुपयांचा नफा कमविला होता. दोघे व्यवसायासाठी नवीन जागाही घेणार होते. असे सर्व चांगले चालले असताना अमोल हा आपल्याला भागीदारीतून बाहेर काढणार असल्याचा महेश याला संशय आला आणि त्याने रागाच्या भरात अमोल याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करीत खून केला.
खुनाची घटना घडल्यानंतर आरोपीचा माग काढण्यासाठी पोलीस प्रशासनाची सहा पथके कार्यरत करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीवी फुटेज च्या माहितीवरून गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. सदर घटने पासून 17-18 तासातच पोलिसांनी आरोपीला दौंड मधूनच जेरबंद केले.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस कर्मचारी पांडुरंग थोरात ,सुभाष राऊत ,नितीन बोराडे, अमीर शेख ,निखिल जाधव ,पांढरे ,बापू रोटे, कोठावळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन घाडगे, असिफ शेख, योगेश नागरगोजे ,अजित भुजबळ, राजू मोमीन ,यांच्या पथकाने कामगिरी केली.