माझ्या बिनविरोध निवडीमागे ‛भाजप’चीही साथ, दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार समारंभात माजी आमदार ‛रमेश थोरात’ यांचा खुलासा

दौंड : पुणे जिल्हा बँकेवर आठव्यांदा संचालक पदी विराजमान झालेले माजी आमदार रमेश थोरात यांचा दौंड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज सत्कार करण्यात आला. यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीमध्ये माझी बिनविरोध निवड व्हावी म्हणून माझ्या पक्षासहित विरोधकांनी सुद्धा मोलाची साथ दिली. मी बँकेत राजकारण करीत नाही हे सर्वांनाच माहित असल्याने विरोधकांनी सुद्धा राजकारण न करता मला मदत केली. विरोधी उमेदवाराने मोठे मन दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यात भारतीय जनता पार्टी मधील जुन्या जाणत्या लोकांचाही सहभाग आहे असे रमेश थोरात यावेळी म्हणाले. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे पक्षाचे पदाधिकारी वैशाली नागवडे, आप्पासो पवार, वीरधवल जगदाळे, राजेंद्र खटी, एड. अजित बलदोटा, ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख, राजेश जाधव, वसीम शेख, संजय चितारे, संध्या डावखरे, प्रशांत धनवे, प्रवीण परदेशी, अजय राऊत आदी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
रमेश थोरात पुढे म्हणाले, चुकीची कामे केली तर कोणतीही संस्था डबघाईत येते, आम्ही बँकेत चुकीची कामे करीत नाही म्हणूनच आपली जिल्हा बँक आशिया खंडात अग्रेसर म्हणून ओळखली जाते. सध्या बँकेमध्ये 1185 कोटी रुपयांच्या ठेवी असून 8500 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यापैकी दौंड तालुक्यात 1900 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झालेले आहे. बँकेत कर्ज प्रकरण आल्यानंतर 24 तासामध्ये शेतकरी बांधवांना कर्ज मिळत आहे असेही थोरात म्हणाले.
रमेश थोरात पहिल्यांदा 1985 साली जिल्हा बँकेवर निवडून आले. ही निवडणूक वगळता बाकी सर्व निवडणुकीमध्ये(7) रमेश थोरात यांची बिनविरोध निवड झाली आहे. रमेश थोरात यांनी एकूण 7 वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद भूषविले आहे.