तुषार हगारे
भिगवण :
भिगवण ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक 5 च्या सदस्या तस्लीम जमीर शेख यांचा खून झाला असून तो खून त्यांच्या मुलानेच केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गेम खेळत असताना आई रागावत असल्याने इयत्ता १२ वी मध्ये शिकत असलेल्या जिशान जमीर शेख (वय १८ रा. उरुळी कांचन ) याला या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे..
याबाबत पोलिस उपनिरिक्षक अमोल लक्ष्मणराव घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांना तस्लीम शेख यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक शवविचछेदन अहवालासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालात गळा दाबून व डोक्याला जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल देण्यात आल्याने पोलिसांनी पती जमीर शेख आणि मुलगा जिशान यांची वेगवेगळी चौकशी केली. त्यावेळी त्यांचा मुलगा जिशान मोबाईलमध्ये पाहत बसला असता त्याच्यावर मयत आई तस्लीम रागावून थोबाडीत मारल्यामुळे रागावलेल्या जिशानने रागाच्या भरात भिंतीवर डोके आपटून खून गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे. वडील नमाजला गेले असताना आईशी भांडण झाल्याने जिशान ने आईचे डोके भिंतीवर आपटले होते. नंतर त्याने आईने आत्महत्या केली असा बनावही रचला होता.
किरकोळ रागातून पोटच्या मुलाच्या हातून तस्लिम यांचा खून झाल्याने त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.