फुकटचे श्रेय लाटू पाहणाऱ्या गाव पुढाऱ्यांना स्वाभिमानी नेत्यांची चपराक, ‘त्या’ कामांच्या उद्घाटनाकडेच फिरवली पाठ

दौंड : प्रत्येक नेता हा आपल्या भागामध्ये विकास व्हावा म्हणून झटत असतो त्यासाठी तो आपल्या जवळच्या लोकांना काही अडचणी, कामे असतील तर सुचवा असेही सूचित करत असतो त्यामुळे अनेकवेळा सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव कामे सुचवत असतात तर सर्वसामान्य नागरिक आपल्या भागातील व्यथा, अडचणी त्यांच्यासमोर मांडून आपली कामे करून घेत असतात. ही कामे होत असताना प्रत्येक कामात कायम श्रेय घेण्याची सवय लागलेले काही गाव पुढारी मात्र जी कामे झाली आहेत, जी होत आहेत आणि जी होणार आहेत ती फक्त आपल्यामुळेच असा अविर्भाव आणून नको त्या कामाचेही श्रेय घेण्यासाठी धडपड करून अखेर स्वतःचे हसू करून घेतात.

जवळ आले, पण उदघाट्नाला नाही गेले… ‘हा इशाराच’

असाच काहीसा प्रकार या भागामध्येही पहायला मिळाला आहे. स्वयंघोषित गाव पुढाऱ्यांनी ज्या कामांना विरोध केला, ज्या कामांची स्वतः कधी मागणी केली नाही, आणि जी कामे दुसऱ्यांनी मागणी करून ती पूर्ण झाली त्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न या महाभागांनी केला. अश्या या महाभागांनी आयोजित केलेल्या उदघाटन कार्यक्रमाला स्वाभिमानी नेत्यांनी पाठ दाखवून आपल्या कृतीतून त्यांना चांगलीच चपराक दिल्याचे  दिसत आहे.

ज्या कामाला विरोध करायचा, त्याच कामाचे उदघाटन करायला पुढे पुढे करायचे… स्वयंघोषित पुढाऱ्यांनी ज्या कामांना कायम विरोध केला, सत्ता असताना ती कामे कधी केली नाही आणि ती कामे पूर्ण करण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच, सदस्य सरसावले होते. मात्र ती कामे होऊ नये म्हणून अर्ज भानगडी करून ती कामे बंद पाडण्यासाठी अहोरात्र झटणारे गाव पुढारी, ही कामे झाल्यानंतर मात्र स्वतःची टिमकी मिरविण्यासाठी एका रात्रीत कामाचे बोर्ड तयार करून गावात स्वतःची पाठण थोपटून घेण्यासाठी सरसावताना दिसले. ही बाब नेत्यांच्या कानावर होती असेही समजते. उदघाटन कार्यक्रमाला स्वाभिमानी नेते गेल्यानंतर त्यांनी हाकेच्या अंतरावर एका रस्त्याचे उदघाट्न केले. मात्र ज्या दोन ठिकाणी गावपुढाऱ्याने बोर्ड लावून त्या झालेल्या कामांचे श्रेय स्वतः घेऊ पाहिले त्या उदघाट्नाला मात्र स्वाभिमानी नेत्यांनी न जाता ‘आतातरी सुधरा, नाहीतर मलाही विचार करावा लागेल.. असा इशाराच जणू आपल्या कृतीतून दिला. इतका पानउतारा होऊनही सुधरतील ते गावपुढारी कसले. या गावपुढाऱ्यांनी मग रात्री झोपण्याच्या वेळी काहीजणांना जमवून, स्वतःच फटाके फोडून स्वतःच्याच हाताने उदघाटन करून घेतले.  नेत्यांनी दिलेली चपराक आणि ईशारा आतातरी हे गावपुढारी समजून घेतील का आणि कुटील राजकारण करण्यापेक्षा सामाजिक भान ठेवून वागतील का अशी चर्चा आता पंचक्रोशीत सुरु झाली.

नेत्यांवर नाराज नाही, गाव पुढाऱ्यावर नाराज

या ठिकाणी जनता वरिष्ठ नेत्यांवर कधीच नाराज नव्हती आणि आजही नाही मात्र आपल्या अरेरावीतून गावात दहशत माजवून गावातील वातावरण खराब करणाऱ्या आणि कायम खालच्या दर्जाची भाषा वापरून  धमक्या देणाऱ्या गाव पुढाऱ्यांवर मात्र लोक नाराज असल्याचे वेळोवेळी दिसत आहे. चांगले काम असूनही याचा मतदान रुपी मोठा फटका मात्र वरिष्ठ नेत्यांना सोसावा लागला आहे. जे खरं घडतं ते कधी नेत्यांपर्यंत जाऊ दिले जात नाही. आणि जे खोटं असतं ते दहावेळा सांगून नेत्यांना त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलं जातं असा अनुभव अनेकजण सांगतात. आजही लोक फक्त अश्या या महाभागांमुळे थेट नेत्यांच्या संपर्कात राहत नाहीत. जे नेत्यांच्या जवळ गेले त्यांच्यासोबत मोठ मोठी षडयंत्र रचून त्यांना बाजूला केले गेले असेही अनुभव अनेकजण सांगत आहेत त्यामुळे नेते चांगले असतानाही केवळ स्वतःला राजकारणातील किंग समजणाऱ्या आणि जर कुणी माझ्या परस्पर नेत्यांकडे गेला तर त्याच्यासोबत मग षडयंत्र सुरु करणाऱ्या अश्या महाभागांमुळे सर्वसामान्य जनता आजही नेत्यांपासून दूरच राहत आली आहे.