रयत क्रांती प्रदेशाध्यक्षांचा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश

पुणे : रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथील मोदी बाग कार्यालयामध्ये भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

भानुदास शिंदे यांनी शेतकरी चळवळीतील नेते स्वर्गीय शरद जोशी यांसोबत काम केले आहे. शरद जोशी ते शरद पवार असा हा प्रवास शिंदे यांचा झाला असून गेली 25 वर्ष ते सातत्याने शेतकरी चळवळीत काम करत होते. त्यांनी 1999 पासून शेतकरी चळवळमध्ये कामाला सुरुवात केली होती. शाखा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, राज्य प्रवक्ता ते रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशी पदे त्यांनी शेतकरी चळवळीत भूषवली आहेत. स्व. नेते शरद जोशी यांसह माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे.
वेगवेगळी शेतकरी आंदोलने, ऊस आंदोलन दूध आंदोलन, कर्जमुक्ती आंदोलन या सर्व आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांनी ऊसदर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही काम केले आहे.

यापुढे शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित शेतकऱ्यांच्यासाठी काम केले जाईल व राज्यभरामध्ये शेतकरी हिताची कामे केली जातील असे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेवाळे, प्रदेश सचिव  नामदेव ताकवणे, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते अर्जुन कोऱ्हाळे, भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक महादेव चौधरी, प्रगतशील बागायतदार खंडागळे उपस्थित होते.