दौंड मधील अपघातामध्ये भाऊ -बहिणीचा जागीच मृत्यू

दौंड : दौंड-काष्टी मार्गावरील धनश्री लॉन्स समोर पिक अप( टेम्पो) ने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सख्खे बहिण- भाऊ ठार झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली. अनुष्का गणेश शिंदे ( वय 14), आदित्य गणेश शिंदे (वय 12, दोघेही रा. निमगाव खलु,ता. श्रीगोंदा) अशी अपघात मयत झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आज दि.31 मार्च रोजी सकाळी 8.30 वा. दरम्यान दौंड ते काष्टी मार्गावरील धनश्री लॉन्स समोर सदरचा अपघात घडला. निमगाव खलु येथे राहणाऱ्या अनुष्का शिंदे ही दौंड मधील एका खाजगी शाळेत शिक्षण घेत होती आज तिची परीक्षा होती त्यासाठी हे दोघे भावंडे आपल्या दुचाकीवरून निमगाव खलू हुन दौंडला येत होते. त्यांची दुचाकी धनश्री मंगल कार्यालय समोर आली असता त्यावेळी दौंड होऊन काष्टी च्या दिशेने जाणाऱ्या एका नवीन पिकअप ने त्याच्या समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होते की यामध्ये दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला व दुचाकीवरील भावंडाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पिकअप चा चालक गाडी सोडून फरार झाला. अनुष्का इयत्ता नववी मध्ये तर तिचा भाऊ आदित्य हा इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होते अशी माहिती स्थानिकांनी दिली. दोघा भावंडाचा अपघातामध्ये दुर्देवी अंत झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.