रीलस्टार बालाजी घोडके याला दागिने आणि 10 मोबाईल चोरी प्रकरणी अटक

यवत (समीर सय्यद) : सोशल मीडियावर रील बनविणाऱ्या बालाजी घोडके याच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दागिने, 10 मोबाईल आणि इतर कागदपत्रे चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यवत गावातील मोबाईल व्यावसायिक साजिद गणी शेख (रा.यवत, ता.दौंड) यांच्या फिर्यादीवरून बालाजी बळीराम घोडके (रा. आनंदग्राम सोसायटी, यवत तालुका दौंड जिल्हा पुणे) याच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी घोडके याने वेगवेगळ्या कंपन्यांचे 10 मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड असा एकूण दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरल्याचे साजिद शेख यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले असून जर माझ्या विरोधात तू पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर ‘मी तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा (जातीवाचक शिवीगाळ) आणि विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करेल अशी धमकी सुद्धा आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यवत पोलिसांनी आरोपीला अटक करून आज माननीय न्यायालयाच्या समोर हजर केले असून घटनेचा पुढील तपास यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नगरे करीत आहेत.