मामाच्या खुनाचा बदला भाच्याच्या खुनाने.. आज ज्या आयुषला मारले तो वनराज आंदेकर चा भाचा होता..

पुणे : आज शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पुण्यातील नानापेठ परिसरात दोन अज्ञात इसमांनी आयुष गणेश कोमकर याची गोळ्या घालून हत्या केली आहे. वनराज आंदेकर याच्या खूनात गणेश कोमकर हा सहभागी होता त्यामुळे त्याच्या 19 वर्षीय मुलाचा गोळ्या घालून खून करण्यात आला अशी माहिती समोर येत असून आयुष कोमकर हा वनराज आंदेकर याचा भाचा होता अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

खून झालेल्या मुलाचे नाव आयुष गणेश कोमकर असे असून तो क्लासवरून बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आल्यानंतर तो वर जात असताना दबा धरुन बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर समोरून गोळ्या झाडल्या. यात तो गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. त्यानंतर हल्ला झालेल्या आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

वनराज आंदेकर याच्या खूनात गणेश कोमकर याचा सहभाग होता तसेच आयुष हा गणेश चा मुलगा आणि वनराज याचा भाचा होता. वनराज आंदेकर याचा खून झाल्यानंतर गणेश कोमकरला अटक होऊन त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. सध्या तो जेलमध्ये आहे. वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने फिल्डिंग लावली होती मात्र दोन दिवसांपूर्वी आंदेकर टोळीचे मन्सूबे पोलिसांना समजताच त्यांनी मोठी धरपकड केली होती.

मात्र आज आयुष कोमकर याच्या झालेल्या हत्येने पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर दाजी मेहुण्याला मारत असेल आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या भाच्याला संपविले जात असेल तर टोळीयुद्ध आता थेट घरापर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. या प्रकरणात आता पुढे काय होते या विचाराने पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.