दौंड रेल्वे स्टेशनचे पंतप्रधान ‛नरेंद्र मोदी’ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे केले ‛भूमिपूजन’, आमदार ‛राहुल कुल’ यांनी मानले मोदींचे आभार

अख्तर काझी

दौंड : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. या योजनेमध्ये दौंड रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. दौंड स्थानकाच्या विकासासाठी तब्बल 44 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे त्यामुळे या स्थानकाचा मोठा कायापालट झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

प्रत्येक स्थानक शहराचे सिटी सेंटर म्हणून विकसित केले जाणार आहे ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा मिळणार आहेत. दौंडसह सोलापूर विभागातील 11 रेल्वे स्थानकांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रातील एकूण 44 स्थानके 1696 कोटी रुपये खर्च करून आधुनिक बनविण्यात येणार आहेत.

आज दि. 6 ऑगस्ट सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग द्वारे सदर विकास कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यामध्ये दौंडकरांना सहभागी होता यावे यासाठी येथील रेल्वे प्रशासनाकडून सोय करण्यात आली होती. येथील रेल्वे स्टेशन प्रांगणात भव्य मंडपाची व्यवस्था करून त्या ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात आलेले होते. दौंडकरांनीही यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली व व्हिडिओ कॉन्फ्रेसींग द्वारे झालेल्या उद्घाटन समारंभाचा आनंद घेतला. यावेळी दौंड चे आमदार राहुल कुल ,रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता गजानन मीना, मा. आमदार रमेश थोरात, तहसीलदार अरुण शेलार ,स्टेशन प्रबंधक जगन्नाथ त्रिपाठी, प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, पवन कोल्हे (SSE), वाणिज्य निरीक्षक सुधाराणी, दौंड चे पो. नि. भाऊसाहेब पाटील ,आरपीएफ पो. निरीक्षक सोलंकी विविध पक्षाचे पदाधिकारी, मा. नगरसेवक आदी उपस्थित होते.

यावेळी राहुल कुल म्हणाले की, अमृत भारत योजनेमध्ये दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याचा सर्वांनाच आनंद आहे. रेल्वेचे दर न वाढविता ज्यांची क्षमता आहे त्या क्षमता असणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा चांगल्या सुविधा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांनी सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे.मा. मोदी साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दौंड रेल्वे स्थानकाचा सुद्धा या योजनेत समावेश केला. पर्यावरण तसेच सर्व प्रकारच्या प्रवाशांचा विचार करून रेल्वे स्टेशनचे काम होत आहे. दौंड आणि रेल्वे यांचे खूप जुने नाते आहे. दौंड ची ओळख रेल्वे मुळे आणि रेल्वेची ओळख दौंड मुळे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हे जंक्शन चे ठिकाण असल्यामुळे रेल्वेने विकासासाठी हातभार लावला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जादाच्या सुविधा मिळविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतो आहे. दौंड रेल्वेच्या अनेक प्रश्नांबाबत आपण पाठपुरावा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

शहर व तालुक्यातील विविध विकास कामांसाठी खूप मोठा निधी आपण मिळविलेला आहे. दौंडला जोडणारे सर्व रस्ते आपण उत्कृष्ट दर्जाचे केले आहेत. दौंड चांगले व्हावे असा प्रयत्न करत असताना दौंडला जादाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हा विचार घेऊन आपण काम करत होतो. दौंड ने जरी माझ्यावर कमी प्रेम केले असले तरी दौंडकरांवर प्रेम करताना माझ्याकडून काहीच कमी राहणार नाही याची काळजी मी एकतर्फी प्रेम करून का होईना मी घेतो आहे याची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो असेही राहुल कुल म्हणाले. उप- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तालुक्याला नेहमीच सगळं हाताने मदत केली आहे, आणि त्यामुळेच या सर्व गोष्टी होऊ शकल्या असे सुद्धा कूल म्हणाले.