‛वाळू’ धोरणाबाबत नविन ‛अपडेट’ आली समोर, आता एका कुटुंबाला मिळणार इतकी ‛टन’ वाळू

मुंबई : शासनाचे नवीन वाळू धोरण पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये म्हणजेच प्रति टन १३३ रुपये दराने वाळू मिळणार आहे. महाखनिज या वेबपोर्टलवर खरेदीच्या मागणीची नोंद केल्यानंतरच एका कुटूंबास एकावेळी कमाल ५० टन वाळू मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली आहे.

राज्यात सध्या वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. वाळू उपसा बंदी असल्याने अनेक ठिकाणी चोरून वाळू काढली जाते. या वाळू च्या एक ब्रासची किंमत सुमारे 12 ते 14 हजार रुपये इतकी आकारली जात आहे. याला पर्याय म्हणून आता बांधकामामध्ये क्रश सँडचाही वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. सध्या क्रश सँड 3 हजार रुपये ब्रास च्या आसपास मिळत आहे. शासनाच्या 600 रुपये ब्रास वाळू च्या धोरणामुळे लोकांना आपली घरे बांधताना अतिशय कमी किमतीमध्ये वाळू उपलब्ध होणार असल्याने बांधकामाला येणारा मोठा खर्च हा काही अंशी वाचणार आहे.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी घेतलेल्या वाळू विषयक धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरे बांधण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे मात्र त्याच बरोबर यात वाळू माफियांकडून लोकांच्या नावे वाळू घेऊन ती पुढे काळ्या बाजारात विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने याबाबत कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे.