बारामतीत आता हेच पहायचं बाकी राहिलं होतं.. तरुण मुलांना विकली जात आहेत नशेची इंजेक्शन्स, दोघांना अटक

बारामती : व्यसन, नशा आणि बॉडी बिल्डिंगसाठी शरीरास घातक असे इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना बारामती शहर पोलिसांनी शिताफिने अटक केली आहे. यावेळी २ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना दि.२१/०४/२०२४ रोजी घडली असून बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये पोलीसांकडून पेट्रोलिंग चालू असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. बारामतीमध्ये अगोदर चोऱ्या, दरोडे, चेन स्नॅचिंग, खून या सारखे प्रकार कायम घडत असताना आता नशेची इंजेक्शन विक्रीचा हा प्रकारही सर्रास घडू लागल्याने बारामतीमध्ये गुन्हेगारी कृत्ये वाढताना दिसत आहे.

सुप्रिया सुळे, अजित पवारांमध्ये जुपली..

मिळालेल्या माहितीनुसार बारामती शहर पोलीस पेट्रोलिंग करत असताना पिंपळी गावच्या हद्यीमध्ये कॅनॉललगत अंधारामध्ये दोन इसम हुंदाई वेरना कारमध्ये संशयितरीत्या बसलेले आढळून आले. पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी आपली नांवे अभय सम्राट जाधव (वय २२ वर्षे रा. श्रीरामनगर कसबा बारामती ता. बारामती जि.पुणे) आणि श्रीकांतअर्जुन घुले (वय २३ वर्षे रा. खताळपट्टा ता. बारामती जि.पुणे) अशी असल्याचे सांगितले. या ठिकाणी येण्याचे कारण विचारता ते दोघेही उडवा उडवीची उत्तरे देवू लागली. त्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांची अंगझडती आणि कारची झडती घेतली.

या झडतीमध्ये पोलिसांना मिफेनटरमीन (MEPHENTERMINE) हे मानवी शरीरास घातक असलेली ६० इंजेक्शन मिळून आली. त्यामुळे बारामती शहर पोलीस स्टेशन येथे वरील इसमांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके हे करीत आहेत. याबाबत अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक सचिन शिवदास बुगड यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भेट देवून सदर इंजेक्शनचा उपयोग हृदयविकाराचे आजारामध्ये केला जातो. परंतू सध्या या इंजेक्शनचा उपयोग तरुण मुले ही व्यायाम करुन बॉडी बिल्डींगसाठी व व्यसन म्हणून करत असल्याची सांगितले. तसेच  या इंजेक्शनमुळे कायमस्वरुपी तंद्री लागणे, ब्लडप्रेशर जास्त राहणे, किडनी निकामी होणे असे दुष्परिणाम होत आहेत. अशा प्रकारे बेकायदेशिरपणे इंजेक्शन बाळगणाऱ्या इसमांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.

अशा प्रकारची शरीरास घातक असणारी इंजेक्शन घेवून स्वतःच्या शरीराचे अवयव कायमस्वरुपी निकामी करुन घेण्याऐवजी पारंपरिक व्यायाम करुन शरीरयष्टी कमविण्याकडे तरुणांनी भर द्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक  पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक बारामती संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक  संतोष घोळवे, यांच्या मार्गदर्शनखाली  बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, अभिजित कांबळे, अक्षयसिताप, दशरथ इंगोले, सागर जामदार, दादासाहेब जाधव, विशाल शिंदे, गौरव ठोंबरे यांनी केली आहे.