|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे दोन युवकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची भयानक घटना घडली आहे. पाटस जवळील तामखडा या दोन युवकांची हत्या झाली असून पाटसमध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दोन युवकांची काही जांनासोबत किरकोळ वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर हे दोनजन दुचाकीवरून रात्री साधारण 10 ते 10:30 च्या दरम्यान तामखडा परिसरात गेले असता त्यांच्यावर अगोदर तलवारीने सपासप वार करण्यात आले असावेत आणि नंतर त्यांची तोंडे आणि डोकी दगडाने ठेचून निर्दयपणे त्यांची हत्या करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा या परिसरात होत आहे.
या दोन्ही युवकांचे वय साधारण 21 ते 23 च्या दरम्यान असल्याचे समजत असून इतक्या कमी वयात त्यांचा असा निर्घृण खून व्हावा त्याला तसे कारण तरी असेल का? की फक्त भाईगिरी ची नवीन ओळख होण्यासाठी हे सगळे घडले आहे याबाबत पाटसमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या दोन्ही हत्यांबाबत पोलिसांनी मात्र अजून कुठलीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसून यातील आरोपींपर्यंत लवकरच पोहचून त्यांना जेरबंद केले जाईल अशा हालचाली सुरू झाल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास योग्य दिशेने सुरू आहे.