|सहकारनामा|
दौंड : कुरकुंभ (ता.दौंड) औद्योगिक वसाहत (Kurkumbh MIDC) मधील एका केमिकल्स कंपनीत विजेचा धक्का लागून मृत्यू पावलेल्या कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या कंपनी मालकावर, व्यवस्थापनावर त्वरित सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी येथील मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन या संघटनेने केली आहे.
संघटनेचे पदाधिकारी भारत सरोदे तसेच कुरकुंभ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष नवनाथ गायकवाड व मोजेस पॉल यांनी याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना दिले.
दि.14 मे 2021 रोजी कुरकुंभ MIDC येथील एका केमिकल कंपनी मध्ये एका कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. कामगाराच्या मृत्यूस कंपनी व्यवस्थापनच जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी म्हणून संघटनेच्या वतीने दिनांक 20 मे रोजी दौंड पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. परंतु दौंड पोलिसांनी अद्यापही संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला नाही. येत्या आठ दिवसांमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नाही तर दौंड पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत शासनाच्या कामगार सुरक्षा अधिनियमाला अनुसरून दिलेल्या मार्गदर्शक नियमावली नुसार योग्य ती खबरदारी या कंपनीने न घेतल्या मुळेच कामगाराचा मृत्यू झाला आहे, या कंपनीच्या निष्काळजी पणा मुळेच कामगाराला जीव गमवावा लागला आहे म्हणूनच कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केली आहे असे भारत सरोदे यांनी यावेळी सांगितले.