मावळ : काल रविवारी सुरज काळभोर या युवकाची त्याच्या गहुंजे येथील सासरवाडीत धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत तळेगाव पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली असून सुरज काळभोर याची हत्या त्याची पत्नी अंकिता हिनेच केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुरज काळभोर आणि अंकिता सुरज काळभोर यांचा विवाह अवघ्या दीड महिन्यापूर्वी झाला होता. सुरज काळभोर हा अंकिता हीचा शारीरिक, मानसिक छळ करत असल्याचे अंकिता हीचे म्हणणे आहे. त्यामुळे तिने थेट सुरज याला संपविण्याचा प्लॅन तयार केला. त्यासाठी तिने तिच्या माहेरी गहुंजे येथे जाण्यासाठी सूरजला तयार केले. सुरज आणि अंकिता आकुर्डी (पिंपरी चिंचवड) येथून गहुंजेकडे जाण्यासाठी निघाले. घरी जाण्याअगोदर तेथील शेतात गेले.
यावेळी अंकिताने लघु शंकेला जाण्याचा बहाणा करत एकाबाजूला गेली आणि सुरज बेसावध होण्याची वाट पाहू लागली.सुरज बेसावध आहे याची खात्री झाल्यानंतर तिने स्वतःसोबत आणलेला चाकू बाहेर काढला आणि सुरज च्या पाठीमागून जाऊन त्याचा गळा चिरला. सुरज जमिनीवर कोसळल्याचे पाहून तिने शेतातील दगड आणि टिकावने त्याच्या डोक्यात घातला ज्यामुळे सुरज मृत पावला.
सुरज चा काही हल्लेखोरांनी खून केला असा बनाव अगोदर अंकिताने रचला होता मात्र पोलिसांना तपास करताना शंका आली आणि त्यांनी अंकितावर प्रश्नांचा भडिमार केला ज्यामधे तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. गहुंजे येथे घडलेल्या खुनाचा छडा काही तासांतच पोलिसांनी लावत खऱ्या खुन्याला अटक केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.