पुणे : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)
– साधारण १४ ते १५ वय असणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमजाळात ओढून तिला पळवून आणून ती गर्भवती झाल्यानंतर तिचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नराधमांना (LCB) पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागच्या टीमने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हे दोघेही परप्रांतीय असताना आणि त्यांचा कुठलाही धागादोरा सापडत नसताना मोठ्या शिताफीने त्यांना जेरबंद करण्याचे काम LCB टीमने केल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या टीमला बक्षिस घोषित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भिगवण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक गर्भवती जखमी अवस्थेत असणारी अनोळखी मुलगी एका शेतामध्ये आढळून आली होती. ही मुलगी कोण आहे, ती कुठून आली आहे याबाबत कुणालाच कुठलीच माहिती नव्हती. या गुन्ह्याचा तपास LCB टीमकडे आल्यानंतर एलसीबी चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक विजय कांचन, धीरज जाधव, लियकत मूजावर, पोलीस शिपाई अक्षय जावळे यांनी तपासाची सूत्रे हातामध्ये घेत ती मुलगी जखमी अवस्थेत असताना तिच्याकडून भिगवन पोलीस ठाणे महिला पोलीस नाईक भारती खंडागळे, पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण महिला पोलीस मीना कोळपे आणि रुबीना शेख यांनी पीडित मुलीकडून महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करत अत्यंत कौशल्यपूर्ण कामगिरी बजावली आणि मिळालेल्या एक मोबाईल नंबरचा धागा पकडून हा नंबर संशयीत इसमाचा असल्याची माहीती प्राप्त केली. त्याचा शोध घेत असताना तो लोणावळा येथे असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे दिसून आल्यानंतर या टीमने त्या संशयितास लोणावळा येथून ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला त्यावेळी त्याने त्याचा मित्र राकेश सुरज साहु रा.नगुरदेवा, रामपूर, जिल्हा सिद्धी मध्यप्रदेश) याचे जखमी मुलीशी प्रेमसंबंध होते व त्याने त्या मुलीस तिच्या मुळ गावातून पळवून आणले होते परंतु मुळ गावी पोलीस तक्रार झाल्याचे समजल्यामुळे त्याचा मित्र अनिल संतलाल साहु याने व राकेश सुरज साहु याने त्या मुलीस जिवे ठार मारण्याचा कट करून तिला भिगवण येथील शेतामध्ये घेऊन गेले व ती अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे माहिती असुन देखील तिच्या गळयावर ब्लेडने वार करून तिच्या डोक्यात दगड मारून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु ती मुलगी अजूनही जिवंत असेल म्हणून त्यांनी तिचा पुन्हा गळा आवळून खुन करण्याचा प्रयत्न केला. मुलीची हालचाल मंडवताच ती मेली आहे म्हणून दोघांनीही तेथून पळ काढला पण LCB टीमने केलेल्या तपासात अखेर या दोघांचे बिंग फुटले आणि पोलिसांनी त्यांना अखेर जेरबंद केले. दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीकरीता भिगवण पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले असून जखमी मुलीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.