पुणे : सहकारनामा ऑनलाईन
– वीस लाख रुपयांची खंडणी मागून त्यातील दीड लाख रुपये घेणाऱ्या आरोपीस पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) टीमने जेरबंद केले. LCB चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणातील फिर्यादी विशाल खेडेकर (रा.उरुळी कांचन) यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांना आरोपी अजिंक्य उत्तम कांबळे व त्याच्या तीन साथीदारांनी पळवून नेऊन कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी फिर्यादी यांनी घाबरून जाऊन त्यांनी त्यास दिड लाख रुपये रक्कम दिली व आपला जीव वाचवला होता. मात्र खंडणीमध्ये ठरल्या प्रमाणे इतर रक्कम बाकी असल्याने आरोपी अजिंक्य कांबळे याने फिर्यादी विशाल खेडेकर यांस पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली तसेच उरलेली रक्कम दिली नाही तर तुझ्या लहान मुलास जीवे ठार मारील अशी धमकी दिले होती. यामुळे वरून फिर्यादी यांनी रविवार दि. ५ एप्रिल रोजी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अजिंक्य उत्तम कांबळे (वय २५ वर्षे रा.सहकार नगर, टिळेकरवाडी ता.हवेली) याच्यावर यवत आणि लोणीकाळभोर येथे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच तो यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या कलम ३७९ गुन्ह्यामध्ये फरार होता त्यामुळे LCB टीमने त्याचा शोध घेत त्याला जेरबंद करून लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीला पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोना. विजय कांचन, पोना. लियाकत मुजावर पोना. गुरू जाधव, पोशी. धीरज जाधव, अहिवळे ,अक्षय जावळे यांनी केली.