मुंबई : एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या कुटुंबाने माझी भेट घेतली आहे. ते आरोपांमुळे व्यथित झाले आहेत आणि मी त्या प्रवृत्तीचा निषेध करतो असे भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या kirit somaiya) यांनी म्हटले आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेल्या क्रूझ पार्टीवरील कारवाईनंतर त्यांच्यावर विविध बाजूंनी मंत्री नवाब मलिक यांनी पुरावे देत आरोप केले होते. त्यांनी जे जे आरोप केले त्या सर्वांचे त्यांनी पुरावे दिले तर याबाबत समीर वानखेडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व होत असताना काल समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्नांना उत्तरे दिली तर काही प्रश्न उपस्थित केले होते. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले आणि आम्हाला न्याय मिळावा, त्यामध्ये तुमच्यावर पूर्णपणे विश्वास असल्याचे सांगितले आहे. तर आज दुपारी समीर वानखेडे यांच्या परिवाराने भाजप नेते किरीट सोमय्या यांची भेट घेतली त्यावेळी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर, बहीण यास्मीन वानखेडे आणि वडील ज्ञानदेव वानखेडे हे उपस्थित होते.
याबाबतची माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी दिली असून राज्यातील मंत्र्याकडून वानखेडे कुटुंबातील सदस्यांविरुद्ध झालेला हिन/घाणेरड्या प्रचारामुळे ते व्यथित झाले आहेत. नवाब मलिक यांच्या घाणेरड्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो असे त्यांनी आपल्या वतीने निषेध व्यक्त करताना सांगितले आहे.