पुणे : पुण्यात एक भयानक घटना उघडकीस आली आहे. एका निवृत्त कर्नलने स्वतःच्या पत्नीला गोळी घालून ठार करत स्वतःही आत्महत्या केली आहे. याबाबत विविध अंगाने चौकशी केली जात असून रिटायर कर्नल ने खून करून आत्महत्या का केली असावी याबाबत आता मुंढवा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
आत्महत्या केलेल्या निवृत्त कर्नलचे नाव नारायणसिंग बोरा (75) असे असून गोळी घालून ठार करण्यात आलेल्या पत्नीचे नाव चंपा बोरा (वय 63, दोघे रा. सिटाडेल सोसायटी, बी. टी. कवडे रोड, घोरपडी) असे आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनेस्थळी जाऊन घराचे दार तोडून आत प्रवेश केला त्यावेळी दोघेही पती पत्नी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी या घटनेमागील नेमकं कारण अजून स्पष्ट केलेलं नाही.
कर्नलने पत्नीला ठार करुन स्वतःही आत्महत्या का केली असावी याची माहिती अजून मिळू शकली नाही. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार निवृत्त कर्नल नारायणसिंग बोरा आणि त्यांची पत्नी चंपा बोरा हे दोघे पती पत्नी घोरपडी येथील घरात राहत होते.
निवृत्त कर्नल बोरा यांना तीन मुलं असून त्यांचा एक मुलगा लष्करात असून दुसरा मुलगा मुंबईत तर मुलगी दिल्लीत असते. ही भयानक घटना उघडकीस येण्याआधी त्यांचा एक मुलगा आपले वडील नारायणसिंग यांना फोन करत होता. मात्र त्यांच्या वडिलांनी आणि आईनेही फोन उचलला नाही म्हणून त्यांनी आपल्या मित्रांना घरी जाऊन बघायला सांगितले आणि वरील भयानक घटना उघडकीस आली. या घटनेची पुढील चौकशी मुंढवा पोलीस करत आहेत.