दलित व शोषित समाजावरील अन्याय अत्याचारात वाढ, दौंड मध्ये दलित संघटनांचे आंदोलन

अख्तर काझी
दौंड : सध्या देशातील अनेक राज्यात दलित, मुस्लिम, बहुजन व शोषित घटकांचे अस्तित्वच धोक्यात आणण्याकरिता त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला गेला. अशा अनेक घटनांच्या विरोधात दौंड मधील आंबेडकरी विचारांच्या पक्ष, संघटनांनी आंदोलन केले. आंदोलनामध्ये शहरातील सर्वच दलित संघटनांचे पदाधिकारी, मुस्लिम ,ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी तसेच भीम अनुयायी उपस्थित होते. दलित संघटनांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासनाला यावेळी निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, देशामध्ये सध्या दलित आणि वंचित घटकांवर अत्याचारांचे थैमान माजलेले आहे. संपूर्ण देशात जातीय अत्याचाराने कहर केला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रमाणे परिस्थिती निर्माण झालेली आहे.
डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिले नाही असे सार्वजनिक रित्या बोलले जाते. जातीयवादातून आयपीएस अधिकारी पूरण कुमार यांना आत्महत्या करावी लागते. ही घटना देशातील न्यायव्यवस्थेला हादरवणारी आहे.

नंदुरबार येथील आदिवासी समाजातील जय वाळवी, नांदेड येथील मातंग समाजातील लखन भंडारे आणि पूजा, बीड येथील वाल्मीक समाजातील यश टाक, लासलगाव येथील भूषण चावरे, रायबरेली येथील हरी ओम वाल्मिकी, खामगाव येथील बौद्ध समाजातील रोहन पैठणकर, जामनेर येथील मुस्लिम समाजातील सुलेमान खान, परभणी येथील संविधान रक्षक व वडार समाजातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी अनेक दलित, आदिवासी, बहुजन आणि मुस्लिम घटकांच्या हत्याकांडाच्या घटना या जातीच्या राजकारणा मुळे झालेल्या आहेत.

या सर्व घटनांमुळे देशभर भयभीत आणि तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या मृत्यूस पाच दिवस उलटले तरी त्यांच्या अंत्यविधीचा निर्णय झालेला नाही. गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्यामध्ये कोणत्याही आरोपीचे नाव समाविष्ट नाही. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई साठी अपेक्षित असलेले कलम लावलेले नाही. आयपीएस अधिकारी असूनही केवळ जातीने वाल्मिकी असल्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही हे लोकशाहीला काळीमा फासणारे आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

देशातील दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक घटकांवरील अन्याय ,अत्याचार राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात यावेत, देशभरात जे दलित आणि आदिवासी हत्याकांड झाले आहेत त्या सर्व प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, जातीयवादी प्रवृत्तीला आतंकवादी घोषित करण्यात यावे, एखादे हत्याकांड जातीच्या कारणावरून झाले असेल तर पीडित कुटुंबाला तात्काळ एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोर या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात डामण्यात यावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांचा हस्तक म्हणणारे, त्यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या समाजकंटक अनिल मिश्रा, आनंद स्वरूप तसेच आरक्षणाला विरोध करणारे राम भद्राचार्य यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.