दौंड तालुक्यात ‛पवार विरुद्ध पवार’ गटबाजीला सुरुवात | वरवंडकर म्हणतात ‛आम्ही साहेबांसोबत’

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यातील पवार विरुध्द पवार गटबाजी आता दौंड तालुक्यातही चांगलीच जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावर दररोज पाठिंब्याचे बॅनर झळकत आहेत. कुणी अजित पवार गटाला पाठिंबा देत आहे तर कुणी शरद पवारांच्या गटाला पाठिंबा देताना दिसत आहे. यात आता दौंड तालुक्यातील वरवंड गावाची भर पडली असून या गावातील राष्ट्रवादीच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दर्शविला आहे.

वरवंड येथील कै. रामदास नाना दिवेकर यांच्या बहुतांश समर्थक आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये दिपक दिवेकर, शामराव फरगडे, दशरथ दिवेकर, दिलीप दिवेकर, सुरेश दिवेकर, केशव दिवेकर, विजय शितोळे, सोमनाथ दिवेकर, गणपत दिवेकर, नानासो दिवेकर, काळूराम शेलार, राहुल भांडारी यांचा समावेश आहे तर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष आणि कै. रामदास नाना दिवेकर यांचे सुपुत्र राहुल दिवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शीविला आहे. वरवंड येथून जिल्हा परिषद लढवण्यासाठी इच्छुक असलेले प्रदीप दिवेकर यांनी मात्र अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

एकंदरीतच दौंड तालुक्यात सध्या कुल विरुद्ध थोरात ही गटबाजी मागे पडून शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी गटबाजी उफाळून आल्याचे दिसत आहे. तालुक्यामध्ये शरद पवार गटाला आप्पासाहेब पवार, सोहेल खान, बादशहा शेख, रामभाऊ टुले, डॉ.वंदना मोहिते, अजित शितोळे यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याचे दिसत आहे तर अजित पवार गटाला माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, यांसह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याचे दिसत आहे.