दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरावरील कोरोनाचा फास आवळतच चालला आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांच्या अंमलबजावणी चाही असर होताना दिसत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे.
मागील चार दिवसातच तब्बल ४४ लोकांना करोनाची लागण झाली आहे, यावरून करोना चा संसर्ग शहरात किती झपाट्याने पसरतो आहे याची प्रचिती येत आहे. शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्यां पासून बंगल्यात राहणाऱ्यां पर्यंत च्या लोकांना करोना ची लागण झाली आहे. ज्यांना संसर्ग झाला आहे त्यापैकी अनेकांची यात चूक नाही असेही दिसते आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ज्यांनी काळजी घेतली अशांना सुद्धा कोरोना झाला आहे, आणि सर्व परिस्थितीची माहिती असून सुद्धा जे बेजबाबदार पणे वागले आहेत. अशा लोकांना हि करोना झाला आहे. त्यामुळे हा संसर्ग का व कसा झाला यावर आता चर्चा करण्या पेक्षा या पुढे तरी शहरात करोनाचा संसर्ग शहरात अधिक पसरू नये म्हणून प्रशासनाला आणखीन प्रयत्न करावे लागणार आहेत. वाढती रुग्णांची संख्या व स्थानिकांकडून अपेक्षित असणारे सहकार्य मिळत नसल्याने प्रशासन पुरते हतबल झाल्याचे चित्र सध्या दौंड मध्ये दिसत आहे.
बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना गृह विलगीकरण करण्याचे काम नगरपालिका कर्मचारी करीत आहेत, परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे, त्यांच्याकडे स्वतःच्या सुरक्षते साठीची साधने नसल्याने ते तणावाखाली काम काम करीत आहेत. त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासन त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी साधने, सुविधा पुरवीत नाही. त्यामुळे हे हे सर्व कर्मचारी भीतीच्या छायेतच काम करीत आहेत हे कर्मचाऱ्यांकडून च समजते आहे. या कर्मचाऱ्यांनी जर ही कामे करणे बंद केले तर मात्र शहराची अवस्था यापेक्षा भिषण होऊ शकते, हे लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत त्यांना शासनाकडून आवश्यक साधने पुरविण्यासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन त्यांना ती मिळवून द्यायला हवीत.
शहरातील संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रशासना सहित सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या शहरासाठी येथील राजकारण्यांनी आपले राजकीय जोडे,हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावे व या महामारी पासून शहराला वाचवावे. धारावी पॅटर्न,मालेगाव पॅटर्न,बारामती पॅटर्न असे अनेक पर्याय संसर्ग रोखण्यासाठी आपल्या समोर आहेत, यापैकी कोणताही पॅटर्न शहरात राबवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज झाली आहे. आज शहराला तुमची खरी गरज आहे, तुम्ही एकत्र येऊन प्रशासनाकडून दौंड करांना महामारी पासून वाचविण्यासाठी चांगल्या सुविधा,उपचार मिळवून दिले तरच हे शहर करोना मुक्त होणार आहे, या गोष्टी येथील राजकीय नेत्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे अशी अपेक्षा दौंडकर करीत आहेत.