राहुल अवचर
देऊळगावराजे :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत देऊळगाव राजे येथील विशाल ईश्वर पोळ हा उत्तीर्ण झाला असून देऊळगावराजे गावात पहिला फौजदार होण्याचा मान विशाल पोळ याने मिळविला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन २०२० साली घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत विशाल पोळ याने यश मिळवून गरुडझेप घेतली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले, मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात परंतु विशाल ने कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याच्या या यशामुळे गावातील युवकांना पुढील काळात नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंका नाही.
विशाल पोळ याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातूनच पूर्ण झाले तर पुढील शिक्षण दौंड बारामती पुणे येथे झाले. देऊळगावराजे सारख्या खेडेगावातून पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन विविध पदापर्यंत पोहोचणारे गावातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर अधिकारी झाले आहेत. दरम्यान विशाल पोळ याने पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. परिस्थिती नसताना विशाल पोळ यानी यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत बोलताना विशाल पोळ म्हणाले कि, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये. तर नव्या जोमाने अभ्यास करा यश तुम्हाला नक्की मिळेल हे मिळालेले यश वडील ईश्वर पोळ मोठे बंधू देऊळगाव राजेचे पोलीस पाटील ॲड सचिन पोळ यांनी कायम साथ दिली म्हणून गाठू शकलो असे विशाल याने आवर्जून सांगीतले.