अख्तर काझी
दौंड
:
शहरातील वाहतुकीला डोकेदुखी ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे सत्र दौंड पोलिसांनी सुरु केले आहे. दौंड शहरामधील सरपंचवस्ती येथे गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी, चौकाचौकात कित्येक वर्षांपासून करण्यात आलेल्या अतिक्रमणावर दौंड पोलिसांनी कारवाई करत दौंडकरांना दिलासा दिला आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हाती घेतलेल्या या कारवाईचे दौंडकरांनी स्वागत केले आहे.
दौंड पोलिसांकडून बेधडक कारवाई होताना यवत पोलीस मात्र गप्प का असा सवाल उपस्थित केला जात आहे. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील केडगाव येथे अतिक्रमणांनी केडगाव ग्रामपंचायतला वेढा घातला आहे. ग्रामपंचायतला लागूनच केडगाव पोलीस चौकी असून या चौकीलाही या अतिक्रमणाचा फटका बसू लागला आहे. केडगावच्या मुख्य बाजारपेठेत, ग्रामपंचायतकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूने अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली आहेत. ही दुकाने कधी काढण्यात येणार असा सवाल येथील नागरिक ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाला विचारत आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी दौंड पोलिसांनी शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणां वरील अतिक्रमणे काढून परिसराचा श्वास मोकळा केला आहे.यामध्ये संविधान चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील रस्त्यालगतची अतिक्रमणे काढली होती.सरपंचवस्ती येथे गोपळवाडी रोडवर वर्षानुवर्षे फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते,मच्छी विक्रेते तसेच चायनीज गाडे व इतर अनेक प्रकारच्या दुकानदारांनी रस्त्यावरच अतिक्रमण केले होते.त्यांनी केलेल्या अतिक्रमाणामुळे रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होत होती.
याचा सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या अतिक्रमणाकडे दौंड पोलिसांनी लक्ष करत अखेर या अतिक्रमाणावर हातोडा मारला आहे. तसेच कुरकुंभ एमआयडीसी वरून सरपंच वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर बसेस कामगारांना घेऊन येत असतात. बस आल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. सरपंचवस्ती रस्त्याने मोठ्या ६०ते ७० बसेस प्रतिदिनी वाहतूक करत होत्या त्यामुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात ३ ते ४ तास वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा वाजत होता .त्यामुळे येथील सर्व बस वाहनांना प्रायोगिक तत्त्वावर दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या कारवाईने सरपंचवस्ती येथील ठिकाणांनी मोकळा श्वास घेतला आहे. कित्येक वर्षानंतर सार्वजनिक ठिकाणे मोकळी झाल्याने दौंडकरांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. उपनिरीक्षक सतीश राऊत, सुप्रिया दुरंदे तसेच सहा.फौजदार सुरेश चौधरी, बबन जाधव, पो.ह.पांडुरंग थोरात, पो.ना. नितीन चव्हाण ,विशाल जावळे, पो.कॉ. योगेश पाटील, अक्षय घोडके, इंद्रजीत वाळुंज, आमिर शेख आदींनी केली आहे.