दरोडा, घरफोडी करणाऱ्या अट्टल आरोपीस दौंड पोलिसांनी केले गजाआड

अख्तर काझी

दौंड : दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरामध्ये दरोडा, घरफोड्या करणारा व मागील एक वर्षापासून फरार असलेल्या अट्टल आरोपीस दौंड पोलिसांनी गिरीम गावातील राघोबा नगर येथे मोठ्या शिताफिने जेरबंद केले. मिथुन प्रकाश राठोड (रा.राघोबा नगर, गिरीम,ता. दौंड) असे अट्टल आरोपीचे नाव आहे.

दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.6 जानेवारी 2024 रोजी कुरकुंभ (दौंड) येथील रहिवासी आशिष प्रजापती यांच्या घरामध्ये घुसून पाच अनोळख्या व्यक्तींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत घरातील रोख रक्कम, मोबाईल असा 46 हजार रुपयांचा ऐवज जबरी चोरी करून लुटून नेला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी मिथुन घटनेनंतर फरार होता, तसेच इतर दोन घर फोड्यांमध्येही त्याचा सहभाग होता.

फरार आरोपी मिथुन दि. 29 ऑक्टोबर रोजी राघोबा नगर येथे आला असल्याची टीप पोलिसांना मिळाल्याने दौंड पोलिसांच्या शोध पथकाने या ठिकाणी सापळा रचित त्याला गजाआड केले. आरोपी विरोधात भिवंडी पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल बारा गुन्हे दाखल असून दौंड हद्दीत पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती गोपाळ पवार यांनी दिली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक उगले, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, विठ्ठल गायकवाड, अमीर शेख, निखिल जाधव, पोलीस कॉ. नितीन दोडमिसे, पवन माने जगताप यांनी केली.