रस्त्यात लूटमार करणाऱ्या आरोपीस दौंड पोलीसांनी पकडले, 3 वर्षांपासून आरोपी होता फरार

दौंड : पैशाच्या लूट प्रकरणी तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी दौंड पोलिसांनी गजाआड केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज दिलीप निमजे (रा.बंगला साईट, दौंड) याने 2018 साली एटीएम मधून पैसे काढून निघालेल्या एका ग्राहकाला मारहाण करून लुटले होते. या लुटमारीनंतर तो त्या दिवसापासून फरार झाला होता. बरेच दिवसापासून पोलीस त्याला शोधत होते. हा फरार आरोपी दौंडमध्ये येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यावर गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक फौजदार सचिन काळे, पोलीस हवालदार असिफ शेख ,सचिन घाडगे, राजू मोमीन यांनी सापळा लावला होता. आरोपी दिसताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली व त्याला ताब्यात घेतले.त्याच्याकडून आणखी काही एटीएम बाबत चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.