मटका-जुगार अड्ड्यांवर दौंड पोलिसांची कारवाई, आठ जणांविरोधात गुन्हे दाखल

दौंड (अख्तर काझी) : शहरामध्ये कोणीही मटका व जुगार अड्डे चालवू नये अशी सक्त ताकीद दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली असताना सुद्धा काही लोकांनी याकडे दुर्लक्ष करून जुगार अड्डे सुरूच ठेवले होते. अशा जुगार अड्ड्यांची माहिती मिळवित दौंड पोलिसांनी या ठिकाणी धाडी टाकून जुगार अड्डे चालविणाऱ्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे कारवाई केली.

ठाणे अंमलदार बापू रोटे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गांधी चौक, कुंभार गल्ली व बंगला साईड परिसरात मटका व जुगार अड्डे चालू होते, या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करीत निरज विक्रम मांझी, मार्कस गायकवाड, कमलेश बेहराणी, रवींद्र साळवे, कृष्णा सोनवणे, प्रकाश सोनवणे, अशोक सोनवणे, सागर पलंगे यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कारवाई केली आहे.

जुगार अड्ड्यांवरून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दौंड शहरामध्ये गुपचूपपणे जुगार आणि मटके अड्डे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती त्यामुळे कोणीही जुगार, मटका चालवत असेल त्यावर कडक कारवाई केली जाईल असा ईशारा दौंड पोलिसांनी दिला होता मात्र तरीही काहीजण जुगार, मटका चालवत होते त्यामुळे अखेर पोलिसांनी धाड टाकत यातील आरोपिंवर गुन्हे दाखल केले आहेत.