दौंड | क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून माजी सैनिकाला भर चौकात लुटले, तब्बल 2 लाख 75 हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार

अख्तर काझी

दौंड : दौंड मधील अतिशय वर्दळीच्या असणाऱ्या शालिमार चौकामध्ये क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून दोन अज्ञात चोरट्यांनी माजी सैनिकाचे सोन्याचे दागिने हात चालाखीने लंपास करून नेल्याची घटना समोर आली आहे. माजी सैनिकाकडील तब्बल 2 लाख 75 हजाराचे किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हात चलाखी करून लुटून नेले आहेत.

सदरची घटना अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी व भर दिवसा घडल्याने परिसरातील नागरिक व व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. याप्रकरणी के. जयचंद्रन (वय 70,रा. कोइम्बतुरे, तामिळनाडू. सध्या रा. जनता कॉलनी, हिंदुस्तान चर्च समोर, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी दुपारी 1.30 वा. सुमारास येथील शालिमार चौकामध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस तेथे अंदाजे 40 ते 45 वर्ष वयाचा एक इसम फिर्यादी यांना भेटून म्हणाला की, मी क्राईम ब्रँच अधिकारी आहे, तुम्ही रेल्वेत नोकरीला होता ना. त्यावर फिर्यादी हो म्हणाले असता, तो म्हणाला की एक्सचेंज ऑफिसर मनोज शर्मा तुम्हाला माहित आहे का? मी चौकशी करीत आहे तुम्ही येथून हलू नका, गोंधळ करू नका. त्यामुळे फिर्यादी शांतपणे थांबले.

दरम्यान त्याने आणखी एका व्यक्तीला आवाज देऊन बोलाविले. ती व्यक्ती त्या ठिकाणी आली असता तो म्हणाला की मी क्राईम ब्रँच अधिकारी आहे, तुझे पाकीट दाखव. हातात अंगठी का घातली आहे, ती काढून तुझ्या रूमालात ठेव आणि तो रुमाल तुझ्याच खिशात ठेव. हे ऐकून त्या व्यक्तीने अंगठी रुमालात ठेवून ती खिशात ठेवली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना रुमाल काढण्यास सांगितले, परंतु फिर्यादी यांच्याकडे रुमाल नव्हता त्यामुळे चोरट्याने स्वतःचा रुमाल त्यांना दिला व म्हणाला की तुमच्या दोन्ही सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चैन काढून रुमालात ठेवा. त्यामुळे फिर्यादी यांनी आपल्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चैन रुमालात ठेवून ती आपल्या खिशात ठेवली.

नंतर ते दोघेही गडबडीने तेथून निघून गेले. फिर्यादी यांनी थोड्या अंतरावर जाऊन आपल्या खिशातील तो रुमाल उघडून बघितला असता त्यात त्यांनी ठेवलेले सोन्याचे दागिने नसल्याचे त्यांना समजले. त्यावेळी फिर्यादी यांच्या लक्षात आले की त्या दोन अज्ञात इसमांनी हातचलाखी करून त्यांचे 2 लाख 75 हजार रु. किमतीचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.