दौंडमध्ये चोरट्यांच्या मारहाणीत BSNL च्या वॉचमचा ‘खून’

अख्तर काझी

दौंड : दौंड मधील भारत संचार निगम लि.(बी. एस. एन. एल.) कार्यालयाच्या वॉचमन चा चोरट्यांच्या जबर मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. प्रकाश ठाकूरदास सुखेजा (वय60,रा. बीएसएनएल वसाहत, दौंड) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

दौंड चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली,2 ते 3 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,26 जुलै रोजी रात्री 2.30 वा. च्या दरम्यान सदरची घटना घडली. प्रकाश सुखेजा रात्रीच्या वेळेस बीएसएनएल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गस्तीवर होते.2-3 अज्ञात चोरटे कार्यालयाच्या आवारामध्ये चोरीच्या उद्देशाने आले आणि त्यांनी कार्यालयातील वायर चोरली. दरम्यान प्रकाश सुखेजा त्या ठिकाणी पोहोचले असता चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना जबर जखमी केले व ते पसार झाले. त्यानंतर प्रकाश सुखेजा यांनी याच वसाहतीमध्ये राहत असलेल्या आपल्या मुलाला व सुनेला आवाज देऊन सदर घटनेच्या बाबतीत माहिती दिली.

बाहेर चोर आलेले आहेत, त्यांनी कार्यालयातील वायरची चोरी केलेली आहे व मला त्यांनी त्यांच्याकडील हत्याराने मारून जखमी केले आहे, त्यांच्याकडे हत्यारे आहेत तुम्ही बाहेर येऊ नका असेही सांगितले. मुलाने बाहेर येऊन पाहिले असता त्यांचे वडील जबर जखमी झालेले होते, डोक्यातून रक्तस्त्राव होत होता व अंगावरील कपडेही रक्ताने माखलेले होते. मुलगा मनोज याने लागलीच दौंड पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमी प्रकाश सुखेजा यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले. परंतु उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दौंड पोलीस पुढील तपास करीत आहेत.