मुंबई : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे पूर्व परिसरात आज रात्री 09:15 वाजता गोळीबार करण्यात आला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 असे सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदही भूषविले होते. वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले. एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली होती.

बाबा सिद्दीकी यांचे राजकीय आणि फिल्म इंडस्ट्रीत खूप मोठे नाव होते. गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोळीबार झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्यांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.