‛थेऊर पॅटर्न’ची परिसरात चर्चा, मोकाट स्वारांना बसला चाप




थेऊर : सहकारनामा ऑनलाईन. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लाॅकडाऊन केल्यानंतर सुध्दा अनेक अतिउत्साही तरुण मोकाट फिरताना दिसत होते यावर थेऊर ग्रामपंचायत तसेच थेऊर पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आपत्कालीन बैठक घेऊन गावातील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूची दुकाने केवळ सकाळी सात ते दहा या वेळेतच चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर सर्व व्यवहार बंद राहतील अशा सूचना दिल्या. याचा परिणाम खुपच सकारात्मक आला असून या थेऊर पॅटर्नची चर्चा संपूर्ण पूर्व हवेलीतील ऐकावयास मिळत आहे. 

लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी या परिसरात अतिशय चोख व्यवस्था ठेवल्याने संपूर्ण गावाने त्यांना चांगली साथ दिली आहे. लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील इतर गावातही हळूहळू हाच पॅटर्न राबविण्याचे ठरले आहे. गेली वीस दिवस पोलिसांना नागरिकावर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कारवाया कराव्या लागल्या आहेत परंतु काही उत्साही मंडळी विनाकारण भटकताना दिसत आहेत.महाराष्ट्र शासनाने हा लाॅकडाऊन पुढे या महिना अखेरपर्यंत वाढवला आहे.