दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
आज संपूर्ण दौंड तालुका स्तब्ध झालाय, या तालुक्याचा जणू प्राण वायूच कुणीतरी रोखून धरलाय असं चित्र आज तालुक्यात पाहायला मिळतंय. माशाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जशी त्याची प्राणवायूसाठी तडफड होते अशीच काहीशी परिस्थिती आज तालुक्याची झालीय.
कारण या तालुक्यात ऊन असो, वारा असो, पाऊस असो, दुष्काळ असो किंवा कोरोना सारखी महामारी असो, अशा परिस्थितीतही एक गाडी सारखी या गावातून त्या गावात आणि त्या गावातून या गावात अशी संपूर्ण तालुकाभर फिरताना दिसायची ती होती 1 नंबर, आता हा नंबर कुणाचा आहे हे तालुका सोडा जिल्ह्यात कुणाला माहीत नाही असा एकही सापडणार नाही.
पण कुणाची (त्या पेक्षा कोरोनाची म्हटले तर वावगे ठरणार नाही) जणू 1 नंबरला आणि ज्यांच्यामुळे त्या गाडीची शान वाढत होती त्या गाडीच्या मालकाला नजर लागली अण काही दिवसांपासून ती गाडी तालुक्यात फिरायची बंद झाली.
या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती गाडी ज्या गावात जाईल त्या गावात असणाऱ्या कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये एक नवचैतन्य संचारलेले दिसायचे. मात्र काही दिवसांपासून हे नवं चैतन्य कुठेतरी हरवल्या सारखं वाटतंय, गावागावातील हिरमुसलेले चेहरे ते नव चैतन्य पुन्हा त्यांच्यात संचारायची वाट पाहत आहेत. मात्र कोरोनाची लागलेली नजर अजून काही कमी झालेली वाटेना, त्यामुळे ती गाडी अजून इकडे फिरकताना दिसेना.
तालुक्यातील अनेक मंदिर, मशिदींमध्ये त्या एका व्यक्तीसाठी हात जोडले जात आहेत आणि प्रार्थना केल्या जात आहेत, की आमच्या दादाला लवकर बरं कर.., लवकर बरं कर. तालुका त्याच्याशिवाय सुना-सुना झालाय, कारण दादा तालुक्यासाठी, तालुक्याच्या हितासाठी दिवस रात्र झटत राहिलाय, जागत राहिलाय, पळत राहिलाय. ज्याचं फळ त्याला हे मिळालंय की त्या माणसाला या धावपळीमुळे कोरोना झालाय. मात्र तालुका इतका मोठा आघात, कधीच सहन करणार नाही की या तालुक्यासाठी केलेल्या धावपळीमुळे दादाला कोरोना झालाय. त्यामुळे मंदिर, मशिदींमध्ये एक-एक जण जाऊन हात जोडत आहे आणि या आरोपातून तालुक्याला बाहेर काढायचे असेल तर दादाला लवकर बरं कर अशी दुवा आणि प्रार्थना करत आहे.
दादाची तीच गाडी, त्याच जोमाने पुन्हा प्रत्येक गावात फिरून एक नवचैतन्य येउदे असा नवसही केला जात आहे. कारण अण्णांच्या पावलावर पाऊल टाकणारा हा योद्धा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेलाही धोपी पछाड देणाऱ्या कोरोना सारख्या एक मोठ्या शत्रूशी लढतोय आणि तो त्या शत्रुलाही गारद करून लवकरच पुन्हा सर्व सामान्यांमध्ये परतेल असा दृढ विश्वासही या तालुक्यातील जनतेला नक्कीच आहे.