दौंड : सहकारनामा ऑनलाईन
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. सदर लॉकडाऊन कालवधीत इमारत व इतर बांधकाम बंद झालेले आहेत. राज्यातील इमारत व इतर बांधकामावर काम करणाऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सध्या कोणतेही कामकाज करता येत नाही. त्यामुळे या सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी अथवा त्यांच्या घरी थांबावे लागत आहे. त्यांना दररोजची रोजंदारी मिळत नाही. यामुळे त्यांना दैनंदिन गरजा भागवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी रू.२०००/- इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (DBT) जमा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. या योजनेत दौंड तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांची नोंदणी आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यातून मागील दोन वर्षांच्या काळात करण्यात आली होती. यापूर्वी या कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा लाभ झाला असून या वैश्विक महामारीच्या काळात हाताला काम नसणाऱ्या कामगारांना यामाध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे.