गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, या पद्धतीने करा गणेशोत्सव साजरा



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनामुळे सध्या संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाउन सुरू आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये अनेक सण आले आणि गेले मात्र सार्वजनिकरित्या कुणालाच सण साजरे करण्याची परवानगी मिळाली नाही. आता सुरू होत असलेल्या गणेशोत्सव सनाचाही त्यामध्ये समावेश असून त्यासाठी शासनाने खास नियमावली बनवली आहे. गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करावा असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरद्वारे केले आहे. गणेशोत्सव साजरा करताना या नियमावलीचे पालन करावेच लागणार आहे.

पाहूया गणेशोत्सव साजरा करताना कोण कोणते नियम आहेत ते..

◆ covid-19 या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे.

◆ उत्सवामध्ये यावेळी श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता उंची 4 फूट व घरगुती गणपतीसाठी उंची 2 फुट इतकी असावी.

◆ श्रीगणेशाच्या दर्शनासाठी ऑनलाईन केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे सेवा उपलब्ध करण्यावर भर द्यावा.

◆ सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

◆ यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.

◆ covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपा बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

◆ सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंगू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

◆ उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेने दिलास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

◆ आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

◆ गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे तसेच शक्यतो थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनीटायझर इत्यादी पाळले जाईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

◆ महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने कृत्रिम तलाव बनवावे व त्यात विसर्जन करावे.

◆ श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. तसेच गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये.