बेबी कालवा दुरुस्तीच्या अंदाजपत्रकांना लवकरच शासकीय मान्यता : आ.राहुल कुल



दौंड : सहकारनामा

बेबी कालवा दुरुस्तीच्या अंदाजपत्रकांना लवकरच शासनाची मान्यता मिळणार असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली. विधानसभा सभागृहात बेबी कालव्याच्या गळतीच्या संदर्भात त्यांनी तारांकित प्रश्नाच्या  चर्चेवेळी बोलत होते. 

यावेळी बोलताना आमदार अॅड. राहुल कुल यांनी तीन प्रश्न उपस्थित केले. बेबी कालव्यावर दौंड व हवेली हे दोन तालुके अवलंबून असून त्यामध्ये पुणे महानगर पालिकेकडून पुर्नपर्क्रीया करून सोडण्यात येणाऱ्या पाण्यातील २०% टक्केच पाणी खाली (टेलला) पोहोचते त्यामुळे या कालव्याचे अस्तरीकरण करणे गरजेचे असून त्याबाबतचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आले असून त्यास जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची मान्यता देखील मिळाली आहेत. त्यास शासनाची मान्यता मिळण्याची विनंती आमदार अॅड. कुल यांनी यावेळी केली. तसेच हा कालवा फुरसुंगी पर्यंत बंद नळीतून करण्याची मागणी केली व पुणे महानगर पालिकेकडून बेबी कालव्यात सोडण्यात येणारे पाणी हे अशुद्ध असून, शुद्ध पाणी सोडण्यासाठी पुणे महानगर पालिकेला बंधन घालण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. 

यावेळी उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले कि खडकवासला प्रकल्पातील बेबी कालव्याचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले आहेत. त्यास लवकरच मान्यता देण्याबाबत चे आश्वासन त्यांनी दिले तसेच फुरसुंगी पर्यंत बंदनळी कालवा करण्याच्यासाठी पुणे महानगर पालिकेला समाविष्ट करून घेण्यात येवून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. व पुणे महानगर पालिकेच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तांना सूचना देण्यात आल्या असून जायका प्रकल्पांतर्गत जागा ताब्यात घेण्याची व निविदाप्रक्रिया करण्याची कार्यवाही सुरु आहे. तो प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी आमदार सुनील टिंगरे व आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या चर्चेत सहभाग घेतला.