दौंड : (सहकारनामा ऑनलाइन)
केडगाव ता.दौंड येथील प्रसिद्ध व्यापारी संतोष शांतीलाल शिलोत यांना वाटेत अडवून लूटमार करणाऱ्या आरोपींना यवत पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. व्यापारी संतोष शिलोत हे दि.१२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांचे मित्रासोबत व्यापारातील उधारी गोळाकरून राहु येथुन केडगाव बाजुकडे येत असताना त्यांना दोन मोटार सायकलवरून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी मारहाण करून त्यांचेकडील साठ हजार रूपये असलेली पैशाची बॅग जबरदस्तीने चोरून नेली होती. सदरच्या गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी लागलीच यवत पोलीस स्टेशनला सदर गुन्हयाचे तपासकामी पोलीस पथक तयार केले होते. सदर पथकामध्ये सहा.पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस हवा. जितेंद्र पानसरे, पोलीस नाईक मंगेश कदम, गजानन खत्री, रविंद्र गोसावी, दादासाहेब दराडे, तात्यासाहेब करे व विशाल जाधव यांचा समावेश करण्यात आला होता. त्याप्रमाणे सदर पोलीस पथकाने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तपणे तपास चालु केला असता पोलीस पथकातील पोलीस नाईक गजानन खत्री व मंगेश कदम यांना त्यांचे बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा पिंपळगाव परीसरातीलच सराईत आरोपींनी केला असल्याची माहिती मिळून त्यातील दोन आरोपी ऊरूळीकांचन रेल्वे स्टेशन परीसरात येणार असल्याची खबर मिळाली त्याप्रमाणे पोलीस नाईक गजानन खत्री व मंगेश कदम यांनी ऊरूळी कांचन येथुन सराईत आरोपी दत्ता अशोक शिंदे, रा. राहु, व स्वप्निल दत्तात्रय तळेकर, रा. केडगाव यांना ताब्यात घेतले तर त्यांचा सहकारी आणि तीसरा आरोपी अक्षय सुरेश खळदकर, रा. नानगाव यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेतले.
सदर गुन्हयाचा पुढील तपास धनंजय कापरे, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत असुन अटक आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता असून आरोपींना मा.न्यायालयाकडुन दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.