दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
काल झालेल्या कांचन कुल यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या हवेली तालुक्यात रणकंदन माजले आहे. हवेलीतील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी कांचन कुल या नवीन आहेत, त्या पक्षात नंतर आलेल्या आहेत, त्यांना अनुभव कमी आहे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे. त्यामुळे खरंच कांचन कुल यांना भाजपने जिल्हाध्यक्षपदाची संधी देऊन भूल केलीय का? असे जर कुणी म्हणत असेल तर याचे उत्तर सध्यातरी नाही असेच असेल कारण कांचन कुल यांच्या निवडीने जिल्ह्यात विधान सभेनंतर भाजपला आलेली मरगळ निश्चितच दूर होऊन ही निवड भाजपसाठी जिल्ह्याला नवंसंजीवनी देणारी ठरू शकते असा विश्वास अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
कांचन कुल यांचा राजकीय इतिहास पाहिला तर त्यांना सासर आणि माहेर अशा दोन्ही घरांमध्ये राजकीय पार्श्वभूमी ही आहेच.
कांचन कुल यांचे सासरे स्व.सुभाष अण्णा कुल हे चांगल्या दिग्गजांना धोबीपछाड देऊन 1990-91 साली पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. सुभाष अण्णा कुल हे तिसऱ्यांदा आमदार असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले त्यानंतर त्यांच्या सासू श्रीमती रंजना कुल या आमदार झाल्या त्यानंतर 2014 आणि 2019 साली त्यांचे पती राहुल कुल हे सलग दोनवेळा विधानसभा निवडणूक जिंकून आमदार झाले आहेत.
2019 अगोदर भाजपमय झालेला संपूर्ण पुणे जिल्हा शरद पवारांच्या झंझावातापुढे गारद झाला मात्र तरीही याला अपवाद कुल कुटुंब राहिलेच, मोठी ताकद लावूनही बारामतीच्या बांधावरच राहुल कुल यांच्या रूपाने कमळ फुलले यातच कुल कुटुंबियांची सर्वसामान्य जनतेमधील असलेले मजबूत पकड लक्षात येते.
कांचन कुल याही खा.सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार होत्या या निवडणुकीत कांचन कुल यांनी आपली चुणूक दाखवत खा.सुप्रिया सुळे यांनी जोरदार आव्हान दिले होते.
बारामती आहे कांचन कुल यांचे माहेर…
कांचन कुल या बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावच्या असून त्यांचं शिक्षण हे BA हिंदी झालेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या कांचन कुल यांच्या नातेवाईक आहेत.
कुल कुटुंबियांचा 1962 पासून राजकारणात आहेत. आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिळून मिसळून असल्याने राजकारणात कुल फॅमिलीचे पारडे कायमच जड राहिलेले आहे. भाजपने कांचन कुल यांना जिल्ह्याची जबाबदारी देऊन एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा जिल्ह्यात रोखण्यासाठीची लगाम ही कुल यांच्या हातात दिली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता भाजपने कांचन कुल यांच्या रूपाने पुणे जिल्ह्याला पुन्हा नवसंजीवनी देण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यामध्ये त्या कमी पडणार नाहीत असे राजकीय जाणकार आपले मत व्यक्त करत आहेत.
माहेर असो की सासर दोन्हीकडे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कांचन कुल या येणाऱ्या काळात पती आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच जिल्ह्यात एक आदर्श निर्माण करून भाजपला अच्छेदिन आणतील यात शंका नाही.