दौंड शहरातील सर्वच व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची शासनाने परवानगी द्यावी, नगराध्यक्ष शितल कटारिया यांची प्रशासनाकडे मागणी



|सहकारनामा|

दौंड : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झाल्याने परिणामी शहरातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दरही खूप कमी झाला आहे, त्यामुळे प्रशासनाने दौंड मधील अत्यावश्यक सेवेतील दुकाना प्रमाणेच इतर व्यावसायिकांनाही आपली दुकाने सुरू करण्याची परवानगी आतातरी द्यावी अशी मागणी दौंडच्या नगराध्यक्ष शितल कटारिया यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्ष योगेश कटारिया, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र  ओझा, हरी ओम उद्योग समूहाचे रोहित पाटील, नगरसेवक प्रमोद देशमुख उपस्थित होते.

शहरातील सर्व दुकाने गेली दोन महिने बंद आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांवर अवलंबून असलेले कामगार यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हफ्ते, विज बिल, विक्रीसाठी आणलेल्या मालाचे पैसे देणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीतही व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून शासनास सहकार्य केले.

शेजारील बारामती शहरात बाजारपेठ सुरू होऊन चार दिवस झाले परंतु दौंड शहराच्या बाबतीत मात्र अद्याप कुठलाही निर्णय शासनाने जाहीर न करणे ही दुर्दैवी बाब आहे. शासनाने दौंड बाबत योग्य तो विचार करून येथील सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अन्यथा येथील व्यापारी वर्ग आंदोलनाच्या पावित्र्यात आहे असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.