जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत आ.राहुल कुल यांनी केली ‘ही’ मोठी मागणी

पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांनी  जिल्ह्याच्या विविध विकास कामे व समस्यांवर चर्चा करताना महत्वपूर्ण मुद्द्यांनाहात घालत पुणे सोलापूर महामार्गवरील नियोजित हडपसर ते कासुर्डी दुमजली उड्डाणपूल हा रेस्कोर्स ते चौफुला (ता.दौंड) पर्यंत करण्यात यावा व लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्गीकेची आखणी करण्यात यावी ही महत्वाची मागणी केली.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा प्रशासनातील सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक विकास आराखड्यास यावेळी मंजूरी देण्यात आली. या माध्यमातून पुण्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे मत आ.कुल यांनी व्यक्त केले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राहुल कुल यांनी खालीलप्रमाणे मागण्या केल्या

१) पुणे सोलापूर व पुणे व नगर महामार्गवरील वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यात यावे

२) पुणे सोलापूर महामार्गवरील नियोजित हडपसर ते कासुर्डी दुमजली उड्डाणपूल हा रेस्कोर्स ते चौफुला, ता दौंड पर्यंत करण्यात यावा व लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्गीकेची आखणी करण्यात यावी

३) जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतीसाठी संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात यावे आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी. अश्या प्रकारच्या मागण्या आमदार राहुल कुल यांनी केल्या असून यामुळे ग्रामिण भागातील महत्वाच्या अडचणी दूर होणार आहेत.

या बैठकीमध्ये, मान्यता देण्यात आलेल्या आराखड्यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी सन २०२५-२६ च्या १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा व ७०० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत १४५ कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेकरिता ६३ कोटी १३ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा आणि ५३ लाख १ हजार रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे.