दुसऱ्याच्या बायकोकडे पाहून हसला! अण तिथेच फसला.. शेतकरी युवकास विटभट्टी चालक आणि कामगारांकडून जबर मारहाण

दौंड : शेतात जा-ये करत असताना बायकोकडे पाहून हसतो या संशयातून एका युवकाला तीन ते चार जणांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याची घटना दौंड तालुक्यातील सोनवडी येथे घडली आहे. याबाबत संतोष पांडुरंग पवार (रा.सोनवडी,ता दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शिवम काशिनाथ कदम (रा.सोनवडी,ता दौंड ) व त्याच्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीस, तु तुझ्या रानामध्ये येता जाताना माझ्या बायकोकडे का बघुन हसतो असे म्हणुन हातातील बांबूच्या लाकडी काठीने फिर्यादीच्या दोन्ही पायावर, पाठीवर मारहाण केली तसेच त्यावेळी तेथील विटभट्टीवर काम करणारे अनोळखी तीन इसमांनी त्यांना मला पाठी मागील बाजुने धरुन ठेवुन पुन्हा शिवम कदम याने शिवीगाळ करुन तुला आता जिवंत ठेवत नाही तु माझ्या बायकोला छेडतो का असे म्हणुन फिर्यादीच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केली. यात डावे हाताचे मनगटावर मार लागुन गंभीर दुखापत करण्यात आली.

हे सर्व होत असताना विटभट्टीवरील अनोळखी इसमाने फिर्यादीस पुन्हा घट्ट पकडुन ठेवत शिवम कदम याने जिवे ठार मारण्याच्या
उद्देशाने फिर्यादीच्या डोक्याच्या उजव्या बाजुस त्याचे हातातील लाकडी काठीने जोरात दोन फटके मारल्याने त्यांच्या डोक्यातुन रक्त येवु लागले त्यामुळे वेदना असह्य झाल्याने फिर्यादी जोरात ओरडल्याने मारहाण करणार शिवम कदम व त्याचे भट्टीवर काम करणारे तीन अनोळखी इसम हे तेथुन पळुन गेले. या बाबत दौंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.