दौंड : दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष टेंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत संदर्भिय नियमावलीतील नियम क्र. १२(१) मधील तरतूदी विचारात घेऊन, श्री. संतोष टेंगले, मुख्याधिकारी गट-अ यांना वाटप झालेल्या “छत्रपती संभाजीनगर विभाग” ऐवजी “पुणे विभाग” बदलून देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या बदल्यांचे आदेश राज्यपालांकडून देण्यात आले आहेत.
आदेशामध्ये महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४) व ४ (५) मधील तरतुदीनुसार, संतोष टेंगले (मुख्याधिकारी) गट-अ संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत असल्याचे म्हटले असून त्यांची पदस्थापना मुख्याधिकारी, दौंड नगरपरिषद येथे करण्यात आली आहे.
सध्याच्या दौंड नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती निर्मला राशीनकर यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचेही या आदेशात म्हटले असून श्री.संतोष टेंगले यांना दि.०६.०४.२०२३ रोजी दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.