दौंड : कोरोना काळात जयंती साजरी करताना न आल्याने यंदा मात्र लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या जल्लोषात व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते शांताराम जोगदंड व मा. नगरसेवक सुरेश येरमाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरामध्ये 48 रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आधार ब्लड सेंटर (पुणे)व प्रकाश सोनवणे यांचे सहकार्य लाभले.मा. ज्येष्ठ नगरसेवक नंदू पवार, आबा वाघमारे, दत्तात्रय सावंत,मा. नगरसेवक प्रणोती चलवादी, राजेश जाधव तसेच अश्विन वाघमारे, शैलेंद्र पवार,प्रकाश कोडाची आदि मान्यवरांनी शिबिरास भेट दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीने येथील अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार संजय पाटील, पो. निरीक्षक विनोद घुगे, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर,मा. जि. प. सदस्य वीरधवल जगदाळे,मा. नगरसेवक तसेच विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.बी. वाय. जगताप, अश्विन वाघमारे, नरेश डाळिंबे, प्राध्यापक भीमराव मोरे, नागसेन धेंडे,नंदू पवार या मान्यवरांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. उद्यानामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणे हा विषय प्रलंबित आहे तो लवकरात लवकर मार्गी लागावा व उद्यानाचे उत्तम प्रकारे सुशोभीकरण व्हावे अशी अपेक्षा अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष आबा वाघमारे यांनी व्यक्त केली.
आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. लहुजी यंग ब्रिगेड मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाची प्रतिकृती येथे उभारण्यात आली होती. आमदार राहुल कुल,मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी अण्णाभाऊंच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी केलेला संघर्ष व समाज उन्नतीसाठीचे त्यांचे योगदानाबाबतचा इतिहास कुल-कटारिया यांनी आपल्या भाषणातून कथन केला. विविध मंडळांनी शहरातून अण्णाभाऊंच्या सजविलेल्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढली, या मिरवणुकीचे स्वागत आमदार राहुल कुल व प्रेमसुख कटारिया यांनी केले व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने युवावर्ग व महिलावर्ग सहभागी होता.