दौंड : दौंड – पाटस रोडवरील गिरिम हद्दीतील हॉटेल जगदंबा मध्ये दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आगीची घटना घडली, या घटनेमध्ये दहा परप्रांतीय कामगार जखमी झाले आहेत. यात सहाजण गंभीर जखमी आहेत. या घटनेची खबर मिळताच दौंड पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली होती ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
हॉटेलच्या ज्या स्वयंपाक घरात घरगुती वापराच्या सिलेंडरचा स्फोट झाला त्या खोलीतून पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने घरगुती वापराचे जवळपास दहा ते पंधरा तसेच आठ व्यावसायिक गॅस सिलेंडर (टाक्या) बाहेर काढून त्यांचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. परंतु तपासाबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू असून या हॉटेलला बेकादेशीरपणे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर पुरविणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

आमच्या प्रतिनिधीने घटनेचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बिद्री यांच्याशी संपर्क साधला असता बीद्री म्हणाले की, गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणाचा तपास अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. याप्रकरणी हॉटेलशी संबंधित किरण आबा सौताडे व लहू जानभरे (दोघे रा. राशिन ,तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासामध्ये या दोघांकडून, हॉटेलला गॅस सिलेंडर पुरवठा नेमका कोणाकडून होत होता याची माहिती घेऊनच संबंधित गॅस पुरवठा धारकावर निश्चितपणे कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांनी स्वतः गॅस सिलेंडरच्या टाक्या बाहेर काढलेल्या आहेत, त्याचा पंचनामा केलेला आहे. तपास निष्पक्षपणे सुरू असून या घटनेतील कोणत्याही संबंधिताला पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही असेही बिद्री यांनी म्हटले आहे.







