दौंड (अख्तर काझी) : दौंड शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या पालकाची सही स्वतःच केली, हा प्रकार वर्गातीलच एका अल्पवयीन विद्यार्थिनीने वर्ग शिक्षिकेकडे उघड केला. त्यामुळे चिडलेल्या त्या विद्यार्थ्याने शाळेतीलच दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला, त्या मुलीचा बलात्कार करून खून करण्याची सुपारी दिली असल्याची घटना मुलीच्या पालकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षिका आणि वर्गशिक्षक (सर्व रा. दौंड) यांच्या विरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 कलम 75, भारतीय न्याय संहिता 2023 कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 च्या दरम्यान शहरातील एका नामांकित इंग्रजी शाळेत घडली होती. फिर्यादी यांची मुलगी या शाळेत इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत आहे. दि.22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कामावरून घरी आले असता, त्यांना आपली मुलगी प्रचंड घाबरून रडत असताना दिसली. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने तिला का रडत आहेस अशी विचारपूस केली असता, तिने सांगितले की माझ्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पालकाची सही स्वतःच केली होती. या प्रकाराबाबत वर्गशिक्षिकेने वर्गात विचारणा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यानेच पालकाची सही केले असल्याचे मी पाहिले असे मुलीने सांगितले.
तसेच याचा राग मनात धरून त्या विद्यार्थ्याने त्याच शाळेत इयत्ता नववी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला 100 रुपये देऊन मुलीचा बलात्कार करून खून करण्याची सुपारी दिली आहे. ही बाब एका विद्यार्थ्याने त्या मुलीला सांगितली, त्यामुळे मुलीने हा प्रकार आपल्या वर्ग शिक्षिकेला सांगितला असता तिला वर्गशिक्षकेने शाळेच्या सुपरवायझरकडे जाण्यास सांगितले. सुपरवायझरने तिला मुख्याध्यापकाकडे जाण्यास सांगितले. घटना जाणून घेऊन मुख्याध्यापक यांनी मुलीसह सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कार्यालयामध्ये बोलावून घेतले. त्यावेळी बलात्कार व खुनाची सुपारी घेतलेल्या विद्यार्थ्यांने घडलेली सर्व हकीगत फादर यांना सांगितली व संबंधित विद्यार्थ्यांने सुपारीसाठीचे दिलेले 100 रु. त्याने फादर यांच्याकडे परत दिले अशी माहिती देत फिर्यादी यांची मुलगी रडतच होती.
घडलेला प्रकार गंभीर असल्याने फिर्यादी यांनी वर्गशिक्षिका व सुपरवायझर यांना फोन करून घटनेबाबत विचारणा केली असता, आम्हाला फादरच्या केबिनमध्ये जायची परवानगी नाही, तुम्हाला काय विचारायचे असेल तर तुम्ही फादरलाच येऊन भेटा म्हणत त्यांनी फोन कट केला. त्यानंतर फिर्यादी यांनी फादर यांना फोन केला असता त्यांनी तो उचलला नाही. त्यामुळे मी विद्यार्थिनीचा वडील आहे तुमच्यासोबत बोलायचे आहे असा संदेश फिर्यादी यांनी फादर यांच्या मोबाईलवर पाठविला. तरीसुद्धा फादर यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी दौंड पोलीस स्टेशनला येऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक यांनी तत्काळ महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सदर प्रकाराची शहानिशा करण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादी त्यांची पत्नी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक हे सर्व दि.25 नोव्हेंबर 2024 रोजी शाळेत गेले. त्यावेळी मुख्याध्यापक यांनी फिर्यादी यांच्या मुलीवरच घाणेरडे आरोप केले व मुलगीच संबंधित विद्यार्थ्यांची बदनामी करीत आहे असा लेखी जबाब त्यांनी विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलेला होता. तसेच मुलीला दुसऱ्या शाळेत टाका असे मुख्याध्यापक सुचवत होते. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी दौंड पोलीस स्टेशन व शालेय शिक्षण विभागात तक्रारी अर्ज दिला.
मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, शिक्षिका यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या विद्यार्थिनी सोबत घडलेला प्रकार लपविण्यासाठी व शाळेची बदनामी टाळण्यासाठी सर्वांनी मिळून, कट कारस्थान करून घडलेला गंभीर स्वरूपाचा प्रकार पाठीशी घालून माहिती लपवून दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थिनीस मानसिक व शैक्षणिक त्रास होऊन नुकसान झाले असे फिर्यादीत नमूद केले आहे.