केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या एका मोठ्या संस्थेबाबत सध्या राज्यभरात वादळ उठले आहे. विविध संदर्भात या संस्थेवर चौकशी बसली असतानाच आता पुन्हा एक मोठे कांड उघडकीस येत आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार या संस्थेत दोन-चार दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याने एक मोठे कांड केले आहे. घडलेले हे मोठे कांड आता लोकांच्या चर्चेतून उघडकीस येत आहे. या संस्थेतील एका कर्मचाऱ्याने येथील दोन ते तीन मुलींच्या असाह्यतेचा गैरफायदा उचलून त्यांचा अनेकवेळा विनयभंग केला आहे. या मुलींच्या छाती आणि इतर नाजूक भागावरून हाथ फिरवून या मुलींचा त्याने अनेकवेळा विनयभंग केल्याचे समजत आहे. मिळत असलेल्या गोपनीय माहितीनुसार याची तक्रार या मुलींनी तेथील एका महिला कर्मचाऱ्याला केली त्यानंतर त्या महिला कर्मचाऱ्याने हे प्रकरण या संस्थेतील वरिष्ठाला सांगितले. या सर्व प्रकारची भनक या नराधम कर्मचाऱ्याला लागताच तो फरार झाला आहे. तर त्याच ठिकाणी काम करणारी त्याची पत्नी या धक्क्यातून आजारी पडल्याने तिला तीच्या माहेरी पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
इतके मोठे कांड घडल्यानंतरही पोलिसांना याची खबर का दिली गेली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून या संस्थेतील वरिष्ठ हे भयानक प्रकरण दाबत तर नाहीत ना असा संशयही व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या संस्थेच्या कार्यापद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोर्चेही काढले गेले आहेत. या संस्थेतील मुलींच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन येथील कर्मचारी त्यांच्याशी दुष्कर्म करत असल्याच्या घटना या अगोदर घडल्या असून त्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत.
या संस्थेची चौकशी लागली असताना आता दोन चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची नागरिकांमध्ये मोठी चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे असाह्य मुलींचा गैरफायदा घेणाऱ्या फरार महाभागाला पकडून तेथील मुलींना न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे.