दौंडमध्ये जेष्ठ नेते प्रेमसुख कटारिया आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) यांच्यात वाद ! कटारिया यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा

दौंड : दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि माजी नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांच्यामध्ये रात्रीच्या सुमारास वाद झाल्याची माहिती मिळत असून त्या वादामुळे आज दौंड शहरामध्ये कटारिया समर्थकांनी निषेध मोर्चा काढला होता. यावेळी निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, उपविभागीय पोलीस अधिकारी हे आपले कर्तव्य बजावित असताना शहरातील ज्येष्ठ नागरिकांशी, विविध पक्षांच्या, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी अतिशय अव्यवहार्य पद्धतीने वागतात, त्यांच्याकडून सामान्यांना मिळणारी वागणूक उद्धटपणाची असते असा आरोप केला आहे. त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.

या आंदोलन मोर्चात माजी नगराध्यक्ष शितल कटारिया, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), ऑल इंडिया पॅंथर सेना, भीम वॉरियर्स संघटना, दौंड मर्चंट व व्यापारी महासंघ, नागरिक हित संरक्षण मंडळ आदींचे पदाधिकारी, मा. नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निषेधाचे व मागणीचे निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी 5 डिसेंबर रोजी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान शहरातील गोल राऊंड परिसरामध्ये ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्याशी अव्यवहार्य वर्तन केले. उपविभागिय अधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे, हे त्यांचे कर्तव्यच आहे यामध्ये दुमत नाही. परंतु  हे सर्व करीत असताना त्यांनी नागरिकांशी गैरवर्तन करणे निषेधार्थ आहे. यापूर्वी देखील त्यांच्याकडून नागरिकांशी उद्धट व गैरवर्तनाचे प्रकार झाले असून, त्यांच्याविरुद्ध अनेक व्यक्ती, पक्ष, संघटना यांनी आंदोलने करून त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

घडलेल्या घटनेबद्दल अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, त्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास दि. 13 डिसेंबर 2023 रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या आंदोलकांनी निवेदनातून दिला आहे.