‘भीमा पाटस’ चा पहिला हफ्ता 3 हजार देणार : आ. राहुल कुल यांची माहिती, तर मागील वर्षीच्या बिलावरून माजी सभापती ‘हंडाळ’ यांचा आक्षेप

दौंड : भिमा पाटस कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता ३००० रूपये देण्याचा निर्णय एम.आर.एन ग्रुप चे अध्यक्ष मुर्गेश निराणी व चेअरमन तथा आमदार अॅड. राहुल कुल यांनी एकत्रित येऊन घेतला असल्याची माहिती आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना भिमा-पाटसचे चेअरमन तथा आमदार अॅड. राहुल कुल म्हणाले की, यावर्षी कारखान्यास येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता 3000 रूपये जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून हे बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. कारखान्याच्या मोळीपूजन कार्यक्रमावेळी आमदार अॅड. कुल यांनी इतरांच्या बरोबरीने भीमा पाटस देखील बाजार भाव देईल असे शेतकरी व सभासदांना आश्वासन दिले होते त्यानुसार 3000 रुपये भाव जाहीर करून हे आश्वासन आमदार अॅड. कुल यांनी पूर्ण केले आहे. सध्या भिमा – पाटसकारखाना पुर्ण क्षमतेने सुरु असून आज अखेर ६०,००० मेट्रिक टनाचे गाळप पुर्ण केले आहे. शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस भिमा पाटस कारखान्यास देवुन सहकार्य करावे असे आव्हान ही अॅड. कुल यांनी केले आहे.

माजी सभापती हंडाळ यांचा मागील बिलावरून आक्षेप – मागील वर्षी ज्यांनी भीमा पाटस ला ऊस दिला त्यांचे उसाचे बिल हे इतर कारखान्यांच्या बरोबरीने काढले जाईल असे भीमा पाटस कारखान्याचे चेअरमन यांनी म्हटले होते. पण ते अजून मिळाले नाही. त्याचे काय झाले, ते बिल काढणार आहे की नाही हे जाहीर करावे असे भीमा पाटस चे शेतकरी सभासद तथा दौंड तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती दिलीप हरिभाऊ हंडाळ यांनी म्हटले आहे. इतर कारखान्यांच्या बरोबरीने बिल काढू असे जाहीर केले मात्र ते बिल भीमा पाटस कारखान्याने एकूण फक्त 2,750 रुपये काढले आहे. त्यामुळे मागील वर्षीचे बिल हे इतर कारखान्यांच्या बरोबरीने काढावे अशी मागणी त्यांनी केली आहे. भीमा पाटस ने यावेळी जो पहिला हफ्ता जाहीर केला त्याचे आम्ही स्वागत करतो मात्र मागील वर्षाचे बिल हे इतर कारखान्यांच्या बरोबरीने देण्याची मागणी त्यांनी केली आहे.