दौंड : राहू / पिलाणवाडी (ता. दौंड) येथील जुनं जाणतं व्यक्तिमत्व प्रगतशील शेतकरी दामू भिकू काळे वय 75 यांचे 15 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कै. दामू काळे यांच्या निधनानंतर काळे परिवाराने सामाजिक दृष्टिकोनातून त्या अस्थी राहत्या घराच्या प्रांगणात झाडासाठी खड्डा खोदला व त्यामध्ये त्या अस्थींचे विसर्जन करून पारिजात झाडाची लागवड केली आणि समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श उभा केला.
वास्तविकपणे एखाद्याचा मृत्यू झाला की त्याचा अंत्यविधी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अस्थी विसर्जन करण्यासाठी त्याच्या परिवारातील लोक आळंदी किंवा पंढरपूर अशा पवित्र देवस्थानच्या ठिकाणी किंवा नदीपात्रात जाऊन अस्थी विसर्जन करत असतात. मात्र काळे परिवाराने केलेल्या या विधायक स्तुत्य उपक्रमाचे दौंड तालुक्यातील सर्व स्तरांमधून विशेष कौतुक होत आहे.
अंत्यविधीनंतर आपण संपूर्ण राख आणि अस्थी नदीपात्रात, ओढे, नाल्यांमध्ये सर्रास टाकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते. तसेच अस्थींची हेळसांड होऊन अवहेलना होत असते. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. या उद्देशाने काळे परिवाराने हा स्तुत्य उपक्रम राबवला. समाजातील सर्वच घटकांनी अस्थी विसर्जन नदी पात्रात करण्याऐवजी आपल्या घरासमोर त्या व्यक्तीच्या आठवणी आयुष्यभर जाग्या राहतील त्यानिमित्त एक तरी वृक्ष लागवड करावी. निश्चितपणे त्यापासून मिळणारी ऊर्जा आणि ताकद ही परिवाराला समाजाला आदर्शवत दिशा देणारी ठरू शकते.
आमच्या वडिलांच्या आठवणी या वृक्षांमधून कायमस्वरूपी जाग्या राहतील. पारिजात वृक्षाचे संगोपन करून सेवा करण्याचे आम्हाला आयुष्यभर भाग्य लाभेल. प्रथमतः आपल्या कुटुंबापासून परिवारापासून अशा विधायक उपक्रमाची सुरुवात करा. निश्चितपणे समाजही अशी सुरुवात करेल.
भाऊसाहेब काळे / संतोष काळे पत्रकार दै.’सकाळ’
काळे परिवाराने समाजाला आदर्श घालून स्तुत्य उपक्रम राबवला आहे. दौंडच्या पश्चिम पट्ट्यात व राहू बेटपरिसरात पहिलाच उपक्रम आहे. या स्तुत्य उपक्रमाचे समाज प्रबोधन करण्याचे काम भविष्यकाळात मोठ्या प्रमाणावर केले जाईल.
बा.मा. शिंदे : समाज प्रबोधनकार राहू (ता.दौंड)
यावेळी माजी आमदार रंजना कुल, रमेश थोरात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, आनंद थोरात, शिवाजी सोनवणे, वैशाली आबणे, नामदेव ताकवणे, वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, महेश पासलकर, माऊली ताकवणे, महेश भागवत , विकास शेलार, वीरधवल जगदाळे, मीनाताई धायगुडे, सुशांत दरेकर, नितीन दोरगे, दिलीप हंडाळ, तात्यासाहेब ताम्हाणे, गणेश आखाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील आजी-माजी अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून काळे परिवाराचे सांत्वन करण्यात आले.