सुधीर गोखले
सांगली : बेडग (ता.मिरज) जिल्ह्यातील बेडग येथे काल रात्री सख्ख्या चुलत भावानेच भावाचा जमिनीच्या वादातून खून केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. रामचंद्र शंकर खरात असे मृताचे नाव असून जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावाने भाऊ रामचंद्र हत्या करत आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.
सचिन बबन खरात (वय 30) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी सचिन खरात याने मृत रामचंद्र याच्यावर मी घाव घातल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला अशी कबुली दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
जिल्ह्यातील वाढत्या क्राइम रेट बाबत चिंता
जिल्ह्यातील वाढत्या क्राईम रेट बद्दल नुकतीच पालकमंत्री ना. डॉ सुरेश खाडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. त्यानंतरही काही दिवसात सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला होता. आता बेडग मध्ये हा सलग दुसरा खून जमिनीच्या वादातून झाल्याने वाढत्या क्राईम रेट बद्दल सर्वत्र चिंता व्यक्त होत असून गुन्हेगारीचा आलेखही वाढत चालला आहे. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.